धरणग्रस्तांची जमीन लाटलेल्या नेत्यांचे सातबाराच जाहीर करू : बुट्टेंचे मोहितेंना उत्तर 

ज्यांच्या काळात भामा आसखेड प्रकल्पाचा हेतू बदलून पाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडला देण्याचा निर्णय झाला; म्हणूनच पुनर्वसनाचा मोठा प्रश्न तयार झाला आहे.
धरणग्रस्तांची जमीन लाटलेल्या नेत्यांचे सातबाराच जाहीर करू : बुट्टेंचे मोहितेंना उत्तर 
i will announce satbara of leader's who looted the land of dam victims : Butte's reply to Mohite

पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व सत्ता असताना ज्यांना 2004 ते 2014 या आमदारकीच्या 10 वर्षांच्या काळात भामा आसखेड धरणग्रस्तांसाठी काडीचेही काम करता आले नाही. दहा वर्षांत भामा नदीवर पाण्याचा एक थेंबही ज्यांना अडवता आला नाही.

उलट ज्यांच्या काळात भामा आसखेड प्रकल्पाचा हेतू बदलून पाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडला देण्याचा निर्णय झाला; म्हणूनच पुनर्वसनाचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. त्यांनी आपले हे अपयश झाकण्यासाठी एका जिल्हा परिषद सदस्यावर त्याचे खापर फोडावे, हे मोठे हास्यास्पद आहे, अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते यांना प्रत्युत्तर दिले. 

बुट्टे पाटील म्हणाले की, कोर्टात न गेलेल्या व पर्यायी जमिनीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपण कुठेही नव्हतो. त्याचे श्रेय देखील आपण कधी घेतले नाही. कारण पुनर्वसन विषय जिल्हा परिषदेचा नसून राज्य सरकारचा आहे.

कोर्टातून निर्णय झालेल्या 388 शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळाली पाहिजे, या विचाराचे आम्ही असून धरणग्रस्त शेतकरी माझ्या जिवाभावाचा असल्याने त्यांना साथ देणे, माझे कर्तव्य म्हणून मी काम करत आलो आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना आणि त्यांची सत्ता असताना देखील आम्ही सर्वांनी धरणग्रस्तांसाठी आंदोलन केले होते. भाजपमध्ये असताना आणि भाजपची सत्ता असतानाही शेतकऱ्यांना अटक करण्याची वेळ आली, त्यावेळी मी स्वतः अटक करून घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो, हे सर्व तालुक्‍याला माहीत आहे, असा दावाही त्यांनी केला. 

धरणग्रस्तांच्या गावात सर्वाधिक विकास कामे मीच केली आहेत; म्हणून तर त्यांनी मला तीन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून दिले आहे.  या धरणग्रस्तांना मिळालेल्या पर्यायी जमिनीमधील एक इंच जमीनदेखील मी किंवा माझ्या कुटुंबाने बळकावलेली नाही.

परंतु तालुक्‍यातील काही नेत्यांनी या धरणग्रस्तांच्या जमिनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर करून घेतल्या आहेत. वेळ आल्यावर अशा बळकावलेल्या जमिनीचे सातबारा उतारे लोकांसमोर आपण नक्कीच आणू, असा इशारा बुट्टे पाटील यांनी दिला आहे. 

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी माझीही मागणी आहे. मागील पाच वर्षात देखील धरणग्रस्तांची आंदोलने झाली. पण, धरणग्रस्त शेतकऱ्यांना कधीही जेलमध्ये जावे लागले नाही. ज्याची जमीन गेली, तो शेतकरी पर्यायी जमीन मिळण्यासाठी प्रयत्न करतो आहे, त्यांना एजंट म्हणणे दुर्दैवी आहे.

ज्यांनी आपली जमीन गेली नसताना धरणग्रस्तांना मिळालेल्या पर्यायी जमिनी त्यांना फसवून आणि सत्तेचा वापर करून आपल्या जवळच्या लोकांच्या नावावर करून घेतल्या आहेत, ते खरे एजंट आहेत आणि त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेवटी बुट्टे यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in