'ससून'च्या कर्मचाऱ्यांमध्ये मला देव दिसला  - I saw God in Sassoon's staff | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

'ससून'च्या कर्मचाऱ्यांमध्ये मला देव दिसला 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 22 जून 2020

आपल्याला कोरोना झाला आहे, हे समजताच अनेकजण प्रचंड घाबरून जातात. त्यात ससून रुग्णालय म्हटले की आणखी चिंता वाढते. येथील पायाभूत सुविधांबद्दल आपण अनेक वेळा निगेटिव्ह ऐकतो. पण कोरोना रुग्ण राहिलेले मनोज शेट्टी यांचा अनुभव मात्र वेगळा आहे. ते म्हणतात ससून रुग्णालयामधील कर्मचारी वर्गात मला देव दिसला . 

पुणे : आपल्याला कोरोना झाला आहे, हे समजताच अनेकजण प्रचंड घाबरून जातात. त्यात ससून रुग्णालय म्हटले की आणखी चिंता वाढते. येथील पायाभूत सुविधांबद्दल आपण अनेक वेळा निगेटिव्ह ऐकतो. पण कोरोना रुग्ण राहिलेले मनोज शेट्टी यांचा अनुभव मात्र वेगळा आहे. ते म्हणतात ससून रुग्णालयामधील कर्मचारी वर्गात मला देव दिसला . 

मनोज शेट्टी यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. नुकतेच ते पूर्णपणे बरे होऊन बाहेर आले आहेत. ससूनमध्ये दाखल झाल्यानंतर आलेला अनुभव त्यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितला.

शेट्टी म्हणाले की, "शुगर म्हटलं की सतत दोन तासांनी, थोड्या थोड्या वेळेचा गॅप घेऊन खायला मिळायला पाहिजे, याची पूर्णतः काळजी ससून हॉस्पिटलने घेतली. रुग्णालयातील कर्मचारी मनेभावे आम्हा कोविड रुग्णांची सेवा करताना दिसले. नाश्‍तामध्ये रुचकर साजूक तुपातील रवा (उपमा), पोहे, शेवई तर कधी गव्हाच्या लॅपशीची खिचडी मिळाली. 

फक्त दूध नाही तर प्रतिकारशक्ती वाढावी; म्हणून हळदचं दूध दररोज दिलं जात होतं. सोबत एक मोसंबी, नॉन व्हेजिटेरियन रुग्णांसाठी उकडलेली अंडी दिली जातात. या नाश्‍त्याच्या वाटपात कुठेही हात मारला जात नाही. म्हणजे सर्व बंद पॅकेटमध्ये असतं. उलट नर्सेस/वार्ड बॉय विचारत असतात अजून कोणाला कमी पडत असेल तर दूध, नाश्‍ता, मोसंबी, अंडी घ्या, पण मस्त बरे होऊन घरी जा. याबाबतीत मीही मागे न हटता दोन अंडी, दोन नाश्‍ताचे पॅकेट आणि जास्तीचं दूध मागून घेताना बिलकुल संकोच करत नसे. 

कोविड रुग्णांसाठी राहण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगताना शेट्टी म्हणाले, रुग्णांसाठी स्पंजच्या बेडची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडच्यामध्ये साधारणपणे पाच फूट अंतर आहे. प्रत्येक बेडजवळ सामान ठेवण्यासाठी टेबल/लॉकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अंगावर घेण्यासाठी ब्लॅंकेटची व्यवस्था आहे. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी "चार्जिंग पॉईंट'ची व्यवस्था आहे. प्रत्येक रुग्णाला बंदिस्त अशा पडद्याची व्यवस्था आहे.

दुसऱ्या पेशंटचा संपर्क, संसर्ग इतर पेशंटला होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचं संपूर्ण कोविड वॉर्ड हा वातानुकूलित आहे. पेशंटच्या सोयीनुसार वातावरण थंड, दमट किंवा गरम ठेवता येते. ससून हॉस्पिटलमधील सुख सोयी पाहिल्यानंतर आपण एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये असल्याचा भास होतो, असे शेट्टी यांनी सांगितले. 

कोविड रुग्णांची मनशक्ती, प्रतिकार शक्ती वाढवावी; म्हणून ससूनचे सर्व डॉक्‍टर, नर्स, वार्डबॉय सर्व कर्मचारी पहाटे एकत्र येत सर्व कोविड रुग्णांना एकत्र आणत "इतनी शक्ती हमे दे ना दाता, मन का विश्वास कमजोर होना' या सुंदर प्रार्थनेने सुरुवात करून पुढे सामुहिक व्यायाम करून घेतात.

ससून हॉस्पिटलमधील स्टाफचे या 12 दिवसांत एवढे प्रेम मिळाले आहे की जर मला एक महिना आयसोलेशन केलं तरी व्यक्तिगत माझी राहण्याची तयारी आहे, अशी प्रांजळ कबुली शेट्टी यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख