आमदार मोहितेंना अडकविणारा पुतण्या कोर्टात हजर; जामीन मिळताच विनयभंगाचा गुन्हा 

त्याच्यामागील अडचणी संपल्या नसून उलट त्या वाढल्या आहेत.
Honeytrap accused Shailesh Mohite appears in Satara court; Filed a case of molestation after getting bail
Honeytrap accused Shailesh Mohite appears in Satara court; Filed a case of molestation after getting bail

पिंपरी  ः पुणे जिल्ह्यातील खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्याविरुद्धच्या हनीट्रॅपच्या गुन्ह्यातील आरोपी आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते बुधवारी (ता. २८ एप्रिल) स्वतःहून सातारा कोर्टात हजर झाला. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. मात्र, लगेचच त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्याच्यामागील अडचणी संपल्या नसून उलट त्या वाढल्या आहेत.

हनी ट्रॅपच्या गुन्ह्यात वापर होण्यापासून ऐनवेळी माघार घेत त्याची माहिती आमदार मोहितेंचा पुतण्या मयूर यांना देणाऱ्या साताऱ्यातील २६ वर्षीय तरुणीने या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामुळे आठ दिवसांत शैलेश व त्याचा साथीदार राहुल कांडगेविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. पहिल्या गुन्ह्यात मयूर मोहिते हे आमदार मोहितेंचे पुतणे फिर्यादी आहेत. शैलेश हा पूर्वी आमदार मोहितेंचा पुतण्या असल्याचे सांगत होता. पण, संबंध बिघडताच आता तो दूरचा नातेवाईक असल्याचे आमदारांकडून सांगण्यात येत आहे. 

मोहिते, कांडगे आणि या तरुणीचा मित्र सोमनाथ शेडगे अशा तिघांविरुद्ध २३ एप्रिल रोजी हनीट्रॅप प्रकरणी खंडणीचा गुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या तिघांनी वरील तरुणीमार्फत आमदार मोहितेंना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा डाव रचला होता. त्यासाठी त्यांनी या तरुणीला एक लाख रुपये दिले होते. पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिषही तिला दाखवण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी तिने ही खबर मयूर यांना दिली आणि हा भंडाफोड झाला. 

दरम्यान, या गुन्ह्यात शेडगेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला जामीन मिळताच शैलेशही बुधवारी कोर्टापुढे शरण आला, त्यालाही जामीन मिळाला आहे. हे कळताच हनीट्रॅपमधील तरुणीने त्यानंतर सातारा पोलिसांत धाव घेत या दोघांनीही आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार दिली. त्यानुसार लगेच गुन्हा दाखल झाला. दोन्ही आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना करणार असल्याचे सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक साजन हंकारे यांनी गुरुवारी सायंकाळी सातारा येथून ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. कांडगे हा पहिल्या गुन्ह्यात अद्याप फरारी असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, १२ वर्षापूर्वी लग्न झालेली ही फिर्यादी तरुणी पतीबरोबर न राहता एकटी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. तिच्या आईचे निधन झाले आहे. ता. १५ एप्रिल रोजी विनयभंगाचा प्रकार घडल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्यादिवशी शैलेश हा आपल्या फ्लॅटवर आला व त्याने आपला विनयभंग केला. नंतर दोन दिवस तो आपल्याशी व्हाटस अपवर अश्लील चॅटिंगही करीत होता, असे तिचे म्हणणे आहे. तर, दोन दिवसांनी म्हणजे १७ एप्रिलला कांडगे आला व त्यानेही तसेच गैरकृत्य केले, असा दावा तिने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com