गृहमंत्री देशमुख फक्त बोलतात, कृती दिसत नाही : दरेकरांचा देशमुखांवर आरोप 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे संवदेनाच दिसत नाही. कारण, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवारी (ता. २५ जुलै) पुण्यात होते. घटनेचे गांभीर्य आणि स्वतःची जबाबदारी ओळखून त्यांनी पुणे जिल्ह्यातील करंजविहिरे (ता. खेड) येथील कलवडे कुटुंबांना भेटून त्यांना आधार, धीर देण्याची गरज होती. तसेच, अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही, असा संदेश समाजाला देणे आवश्यक होते.
Home Minister Deshmukh only speaks, no action is seen: Darekar's allegation against Deshmukh
Home Minister Deshmukh only speaks, no action is seen: Darekar's allegation against Deshmukh

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे संवदेनाच दिसत नाही. कारण, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवारी (ता. २५ जुलै) पुण्यात होते. घटनेचे गांभीर्य आणि स्वतःची जबाबदारी ओळखून त्यांनी पुणे जिल्ह्यातील करंजविहिरे (ता. खेड) येथील कलवडे कुटुंबांना भेटून त्यांना आधार, धीर देण्याची गरज होती. तसेच, अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही, असा संदेश समाजाला देणे आवश्यक होते. मात्र, गृहमंत्री देशमुख हे फक्त बोलतातच, कृती दिसत नाही. या सरकारमधील प्रतिनिधींना राज्यातील गोरगरिबांविषयी कोणत्याही संवेदना किंवा आस्था दिसत नाहीत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. 

करंजविहिरे (ता. खेड) हद्दीतील थोपटवाडी येथे आरती कलवडे (वय १७) हिचा तीन दिवसांपूर्वी विवस्त्र करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. त्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी दरेकर रविवारी (ता. २६ जुलै) आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

पीडित मुलीला विवस्त्र करुन तिची अमानुषपणे हत्या केल्यानंतर मुलीच्या मयतावरही बहिष्कार घातला जात आहे. पिडित कुटुंबावर होत असलेली दहशत ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा विकृत मनोवृत्तीला ठेचून काढण्याची गरज आहे, असे दरेकर म्हणाले. 

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून कुणालाही कायद्याचा धाक राहिला नाही. पनवेल कोविड सेंटरमधील घटना, तसेच पुणे, कोल्हापूर, जालना आदी ठिकाणीही महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. बलात्कार, विनयभंग अशा घटना वारंवार घडत असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गृहमंत्री देशमुख यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून ते या कुटुंबाच्या भेटीला आले नसल्याने या सरकारमध्ये संवेदनशीलता राहिली नसल्याचे दिसून येत आहे, असा हल्लाबोल त्यांनी देशमुखांसह सरकारवर केला. 

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील आदी उपस्थित होते. 

एका प्रस्थापित कुटुंबाकडून आमच्यावर कायम दादागिरी 

गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकले असून आम्हाला मंदिरातही प्रवेश दिला जात नाही. गावातील एक प्रस्थापित कुटुंब आमच्यावर कायम दादागिरी करीत आहे. आमच्या मुलीचा खून झाल्यानंतर कोणताही गावकरी अथवा पुढारी आम्हाला भेटायला आला नाही. वारंवार अन्याय होत असल्याने आम्हाला जात बदलावी, असे वाटू लागले आहे. या लोकांची दहशत मोडली पाहिजे; जेणेकरुन दुसऱ्या कुणाच्या मुलीचा अंत होणार नाही, असे कलवडे कुटुंबीयांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com