The former MLA Mulik family has not gave yet space for the road: Tingre | Sarkarnama

माजी आमदार मुळीक कुटुंबानेच रस्त्यासाठी अद्याप जागा दिली नाही : टिंगरे 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पुणे महापालिकेपासून थेट दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असताना शिवणे-खराडी रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील एकाही प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न जगदीश मुळीक यांना सोडविता आला नाही. त्यामुळे वडगाव शेरीतील मतदारांनी मुळीक यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता स्वतःचे अपयश लपविण्यासाठी ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असे प्रतित्त्युर पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदासंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिले आहे. 

पुणे : पुणे महापालिकेपासून थेट दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असताना शिवणे-खराडी रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील एकाही प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न जगदीश मुळीक यांना सोडविता आला नाही. त्यामुळे वडगाव शेरीतील मतदारांनी मुळीक यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता स्वतःचे अपयश लपविण्यासाठी ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असे प्रतित्त्युर पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदासंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवणे-खराडीसह वडगाव शेरी मतदारसंघातील वीस प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांच्या कामांसंदर्भात आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार पवार यांनी घेतलेल्या बैठकीत भूसंपादनाअभावी रस्त्याची कामे रखडली असल्याचे समोर आले. त्यावर पवार यांनी जागा ताब्यात न देणाऱ्याची विकासकामे थांबवा, असे आदेश दिले आहेत.

त्यावर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी रस्ता अडविणाऱ्या आमदार समर्थकांवर अजित पवारांनी कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या टिकेला आमदार टिंगरे यांनी प्रतित्त्युर दिले आहे. 

आमदार टिंगरे म्हणाले, "लाटेवर निवडून आलेल्या मुळीक यांना भाजपची महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न सोडविता आला नाही. त्यामुळेच आज नगर रस्ता शहरातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेला रस्ता बनला आहे. अनेक निष्पाप नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. भाजपच्या एकाही नेत्याला या प्रश्नाचे गांभीर्य कळाले नाही. मात्र, अजितदादा पवार यांच्या समोर हा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ बैठक लावून रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. उड्डाणपुलांच्या कामाच्या निविदा काढण्यास सांगितले. '' 

वडगाव शेरीतील विकासाच्या दृष्टीने अजितदादांच्या सूचनेकडे मुळीक यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे अपेक्षित होते. मात्र, सायबर आयटी कंपनी येथील रस्त्यांसाठी स्वतः मुळीक कुटुंबीयांनी अद्याप जागा दिलेली नाही, हेही सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजितदादांच्या आदेशानंतर त्यांचे हे बिंग फुटेल, या भीतीपोटी घाबरून गेलेल्या मुळीक यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत.

नक्की कुणाच्या समर्थकांनी वडगाव शेरीतील रस्ते अडविले आहेत आणि रस्त्यांसाठी जागा दिल्या नाहीत. हेही येथील सूज्ञ मतदारांना माहीत आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखविण्याआधी स्वतःकडे चार बोटे आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे, असा इशारा आमदार टिंगरे यांनी मुळीक यांना दिला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची स्टाइल अवघ्या महाराष्टाला माहीत आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न ते निश्‍चितपणे सोडवतील, असा मला विश्‍वास आहे, असे सुनील टिंगरे यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख