शिरूर-हवेलीचा निकाल ठरविणाऱ्या वाघोलीत भाजपला धक्का 

शिरूर-हवेली (जि. पुणे) मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरविणाऱ्या वाघोलीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या एका गटाने भारतीय जनता पक्षाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
शिरूर-हवेलीचा निकाल ठरविणाऱ्या वाघोलीत भाजपला धक्का 
Former BJP Zilla Parishad member joins NCP

शिक्रापूर (शिरूर) : शिरूर-हवेली (जि. पुणे) मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरविणाऱ्या वाघोलीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या एका गटाने भारतीय जनता पक्षाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामागे आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका महत्वाची ठरली. शिरूर-हवेली भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

अर्थात, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला भाजपमधील जुन्या-नव्यांचा वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. पक्षश्रेष्ठींनी वेळीच लगाम न घालल्यास भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेस धक्के देण्याच्या तयारीत आहे. 

वाघोलीतील बडे राजकीय प्रस्थ म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांची ओळख आहे. सन 2014 मध्ये राष्ट्रवादी सोडून त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि शिरूर-हवेलीत भाजपचा प्रवेश सुखकर झाला.

पूर्वीच्या भोसरी मतदार संघात राहिलेल्या वाघोलीकरांचा स्नेह भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासोबत आजही कायम आहे. लांडे यांच्या सूचनेनुसार तसेच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, चंदननगरचे आमदार सुनील टिंगरे आदींशी सल्लामसलत करून निर्णय घेतल्याचे दाभाडे समर्थक सांगतात. 

दरम्यान, शिरूर-हवेली विधानसभा निकालाचा निर्णय ठरविणारे गाव म्हणून वाघोलीचा लौकीक आहे. कारण 2014 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान दाभाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाबूराव पाचर्णे यांनी अशोक पवार यांना धोबीपछाड दिली होती.

यात संपूर्ण शिरूर तालुक्‍यातील मताधिक्‍य आणि एकट्या वाघोलीचे मताधिक्‍य हे बरोबरीत राहिल्याचा इतिहास पाहता वाघोलीतील दाभाडे गट राष्ट्रवादीला मिळणे, हे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मोठी राजकीय ताकद मिळाल्याचे लक्षण आहे. पुण्यात शुक्रवारी (ता. 26 जून) सकाळी झालेल्या पक्षप्रवेशावेळी आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, वाघोलीचे माजी सरपंच शिवदास उबाळे आदी उपस्थित होते. 


जुन्या-नव्या वादाने भाजप हैराण 

रामभाऊ दाभाडे 2014 मध्ये भाजपमध्ये गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी जुन्या-नव्या वादाला सामोर जावे लागले. जुन्यांनी नव्यांना भाजप संस्कृती शिकवायची आणि नव्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. ज्यांच्या पाठीशी जनमत नाही, अशांनी केवळ मोदी-फडणवीसांच्या लौकिकावर मिरवण्याचे धंदे सध्या भाजपत सुरू आहेत. त्याचा फटका बसून विधानसभेला पाचर्णे यांना पराभूत व्हावे लागले. या कार्यपद्धतीमुळे हवेलीतील भाजप केवळ नावापुरती राहील, असे दाभाडे गटाच्या समर्थकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

दादा पाटील यांचे राजीनामा नाट्य 

विधानसभा निवडणुकीनंतर शिरूर भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून दादा पाटील फराटे यांनी पदभार स्वीकारला. मात्र त्यांनाही पक्षातील जुन्या लोकांनी हैराण केल्याचे पक्ष कार्यकर्ते खासगीत सांगत असतात. त्यातून दादा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा आठ दिवसांपूर्वी दिला होता. मात्र, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी विनंती केल्यानंतर दादा पाटील यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याची माहिती आहे. एकुणच शिरुर-हवेलीत भाजपमध्ये जुना-नवा वाद चांगलाच उफाळून आला आहे. 

 मी गेली अनेक दिवस माजी आमदार बाबूराव पाचर्णे, खासदार गिरीश बापट यांच्याकडे पक्षांतर्गत राजकारणाबाबत तक्रारी करीत होतो. सातत्याने तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आपण राष्ट्रवादीत आलो असून पक्षहिताच्या दृष्टीने कुठलीही तडजोड आपण करणार नाही. 
- रामभाऊ दाभाडे, 
माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in