कॉंग्रेसच्या त्या नेत्याच्या बैठकीपासून पदाधिकाऱ्यांनी राखले 'डिस्टन्स' 

गेल्या काही वर्षांतील निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतरही पुणे शहर कॉंग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते काही केल्या सुधारायला तयार नाहीत. गटबाजीमुळे सोयीनुसार एकमेकांपासून "फिजिकल डिस्टन्स' पाळण्याची जुनीच सवय असल्यामुळे त्याचा फटका सोमवारी एका नेत्याला बसला.
कॉंग्रेसच्या त्या नेत्याच्या बैठकीपासून पदाधिकाऱ्यांनी राखले 'डिस्टन्स' 
Factionalism among Congress office bearers again in Pune

पुणे : गेल्या काही वर्षांतील निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतरही पुणे शहर कॉंग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते काही केल्या सुधारायला तयार नाहीत. गटबाजीमुळे सोयीनुसार एकमेकांपासून 'फिजिकल डिस्टन्स' पाळण्याची जुनीच सवय असल्यामुळे त्याचा फटका सोमवारी एका नेत्याला बसला.

कोरोनासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबत बोलाविलेल्या बैठकीकडे पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्या नेत्यावर निवेदन देण्याची वेळ आल्याने पक्षात हा चर्चेचा विषय बनला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी शहरातील कॉंग्रेसच्या एका नेत्याने आज सकाळी साडेदहाची वेळ घेतली होती. त्यासाठी पक्षाचे काही पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. परंतु केंद्रीय पथक येणार असल्यामुळे आयुक्तांनी वेळेत बदल करण्याची विनंती केली. त्याऐवजी साडेबाराच्या सुमारास ही बैठक घेऊ, असा निरोप देण्यात आला होता.

दोन्ही वेळेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दांडी मारली. अखेर साडेबाराच्या सुमारास आपल्या काही मोजक्‍या समर्थकांसह आयुक्तांना निवेदन देऊन परत जाण्याची वेळ त्या नेत्यावर आली. 

कॉंग्रेसला गटबाजी नवीन नाही. येत्या काही दिवसांत विधान परिषदेच्या जागा निघणार आहे. त्यामध्ये आपली वर्णी लागावी, यासाठी शहरातील काही इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातून ही गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. या गटबाजीमुळेच पक्षातील नेते एकमेकांपासून सध्या फिजिकल डिस्टन्स पाळून वागत आहेत. त्यातून क्रेडिट घेण्यासाठी या नेत्याने बोलाविलेल्या बैठकीपासून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक "डिस्टन्स' पाळण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापालिका वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला होता. 

विधान परिषदेत दौंडला संधी हवी : वैशाली नागवडेंची मागणी 

दौंड : पक्षनिष्ठ महिला आणि ग्रामीण चेहरा म्हणून पक्षाकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, पण दौंड तालुक्‍याला संधी मिळायला हवी, अशी इच्छा पुणे जिल्हा राष्ट्रवादी माहिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी व्यक्त केली आहे. 

राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी आवश्‍यक असलेल्या सहकार व स्वयंसेवी संस्थेचा अनुभव या निकषात बसत असल्याने पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उप मुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे वैशाली नागवडे यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सदैव पक्षनिष्ठ म्हणून त्या काम करीत आहेत. उप मुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या गटांमध्ये काम करताना असताना त्यांच्यावर कोणत्याही गटाचा शिक्का नसून पक्ष पदाधिकारी म्हणून त्या परिचित आहेत. 

वैशाली नागवडे या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संचालिका म्हणून काम पाहिले आहे. सन 2007 ते 2012 या कालावधीत त्या दौंड पंचायत समिती सदस्या होत्या. सन 2009 मध्ये त्यांनी राज्य शासनाच्या पंचायत राज समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. सन 2005 ते 2016 या कालावधीत त्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालिका होत्या तर 2013 ते 2016 या कालावधीत त्यांनी महानंदचे अध्यक्षपद भूषविले आहे. सन 2013 मध्ये त्यांची नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) संचालिका म्हणून नियुक्ती झाली होती. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील बरेलीस्थित इंडियन वेटरिनरी रिसर्च इंस्टिट्यूटच्या संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in