परप्रांतीय निघाले गावाला....भूमिपुत्र संधी साधणार का? 

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून अनेकपरप्रांतीय कामगारांनी सुरक्षिततेसाठी गावी जाण्याचा पर्याय निवडला. या दरम्यान कुशल कामगार म्हणून कायम नोकरी असलेले परप्रांतीय मात्र आहे त्या ठिकाणीचराहिले आहेत.
Employment opportunities for locals as foreign workers goes to his native place
Employment opportunities for locals as foreign workers goes to his native place

कोरेगाव भीमा : कोरोनामुळे निम्म्याहून अधिक परप्रांतिय कामगार गावी परत गेल्याने उद्योग-व्यवसाय कसे चालवायचे? असा प्रश्न कारखानदार व व्यावसायिकांना भेडसावत आहे. त्यांची जागा भूमिपुत्र भरून काढणार का? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

पुणे जिल्ह्यात शेतीसह अनेक व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, पश्‍चिम बंगालसह अनेक विविध ठिकाणचे कामगार काम करत होते. लॉकडाउनच्या काळात या कामगारांना प्रशासन, ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्थांनी मोठी मदत केली. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून अनेक कामगारांनी सुरक्षिततेसाठी गावी जाण्याचा पर्याय निवडला. या दरम्यान कुशल कामगार म्हणून कायम नोकरी असलेले परप्रांतीय मात्र गावी न जाता आहे त्या ठिकाणी राहिले आहेत, ही एका दृष्टीने जमेची बाजू आहे. 

स्थानिकांचेही नुकसान 

परप्रांतीय गावी गेल्यामुळे खोल्या रिकाम्या झाल्याने तसेच बाजारातील उलाढाल थांबल्याने स्थानिकांनाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाचा धोका संपेपर्यंत तरी परप्रांतीय कामगार परत येण्याची शक्‍यता नसल्याने या कामगारांशिवाय स्थानिक उद्योग, व्यवसाय कसे चालवायचे? असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे. 

स्थानिकांपेक्षा परप्रांतीयांना मागणी 

माफक मोबदल्यात विनातक्रार सलग कष्टाच्या कामांची क्षमता व मानसिकता असल्याने परप्रांतीय कामगारांना जादा मागणी असते. त्या तुलनेत मोठा पगार व मनाप्रमाणे काम अशी अपेक्षा असलेला मराठी तरुण प्रसंगी आपल्या हक्कांसाठी कामगार युनियन स्थापन करून संप, आंदोलनाच्या माध्यमातून व्यवस्थापनावर दबाव आणतो. त्यामुळे व्यवस्थापन मराठी तरुणांच्या तुलनेत परप्रांतीयांनाच जास्त प्राधान्य देत असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. 

परप्रांतीय मजूर कोरोनोचा धोका संपेपर्यंत लवकर परतण्याची शक्‍यता नाही, तर दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने छोटे व्यवसाय करणारे मराठी तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. हे ओळखून अनेक कारखाने व मजूर कंत्राटदार राज्यभरातील मराठी तरुणांना नोकरीची साद घालणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फिरवत आहेत. त्यात काहींनी तर नोकरीसह निवास आणि भोजनाची सोय केल्याचे नमूद केले आहे. यात गरजवंत स्थानिक मराठी तरुण प्रतिसाद देत आहेत. मात्र हीच संधी समजून राज्यातील मराठी तरुण परप्रांतीयांची जागा भरून काढतील का ? हा प्रश्न कारखानदारांसह सर्वांनाच पडला आहे. 

कोरोना संपेपर्यंत परप्रांतीय कामगार येण्याची शक्‍यता नाही. सध्या एक तृतीयांश क्षमतेने उत्पादनात फारशी अडचण जाणवत नसली तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यानंतर कामगारांची चणचण भासणार आहे. त्यामुळे हीच संधी मानून स्थानिक युवकांनी हे रोजगार मिळवून स्वत:ला सिद्ध करीत ते टिकवलेही पाहिजेत. 
-अजित दरेकर, 
उद्योजक, माजी सरपंच, सणसवाडी (ता. शिरूर) 
 
लॉकडाउनमुळे अगोदरच अडचणीत आलेले खाणउद्योग व्यवसाय आमदार अशोक पवार यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत सुरू केले. मात्र, सध्या कामगार गावी गेल्याने पुन्हा हे उद्योजक संकटात सापडले आहेत. दरम्यान छोटे व्यवसाय बंद झाल्याने अनेक गरजवंत मराठी युवकही नोकऱ्यांच्या शोधात असून त्यांना कारखाने तसेच इतर उद्योगातील रोजगार मिळाल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटून उद्योगही सुरु राहतील. 
-प्रदीप वसंतराव कंद, 
प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com