खेड, मावळमधील सरपंचपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या 

या याचिकेची सुनावणी मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात होणार आहे.
खेड, मावळमधील सरपंचपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या 
Elections for Sarpanch post in Khed, Maval taluka postponed

पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड आणि मावळ तालुक्‍यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यातील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. मावळ आणि खेड तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांमधील सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडी नियोजित कार्यक्रमानुसार ता. 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी पार पडतील, असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील एकूण 746 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सभेत सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीचे आदेश देण्यात आलेले होते. परंतु खेड तालुक्‍यातील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी आणि मावळ तालुक्‍यातील परंदवडी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. 

या याचिकेच्या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले की, याचिकाकर्त्यांनी मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणीकरिता हजर राहावे. तसेच, मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) आणि बुधवारी (ता. 10 फेबुवारी) या कालावधीत घेण्यात येणाऱ्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी न घेता त्या 16 फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवण्यात याव्यात, असे उच्च न्यायालयाच्या आदेश नमूद करण्यात आलेले आहे. याचबरोबर या याचिकेची सुनावणी मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे होणार आहे. 

दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 30 (5) व मुंबई (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आलेले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशाप्रमाणे रिट पिटीशन स्टॅंप क्रमांक 2679/2021, 2892/2021, 2895/2021 व 2906/2021 मध्ये खेड व मावळ हे दोन तालुके आहेत. त्यामुळे ता. 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या खेड आणि मावळ या दोन तालुक्‍यांतील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. 

खेड आणि मावळ या दोन तालुक्‍याव्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित 11 तालुक्‍यांतील (हवेली, मुळशी, भोर, वेल्हे, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडी नियोजित कार्यक्रमानुसार म्हणजेच 9 व 10 फेब्रुवारी रोजी होणार आहेत, असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी नमूद केले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in