नाथाभाऊ आता पिंपरी-चिंचवड शहरातही झाले सक्रिय! भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीत

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरील शहर भाजपमधील हे पहिले आऊटगोईंग आहे.
नाथाभाऊ आता पिंपरी-चिंचवड शहरातही झाले सक्रिय! भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीत
Eknath Khadse supporters from Pimpri Chinchwad BJP join NCP

पिंपरी : भाजपच्या पिंपरी-चिंचवड ओबीसी महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा सारिका पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (ता.१९) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत. त्यांना राष्ट्रवादीत आणल्याने नाथाभाऊ आता पिंपरी-चिंचवडमध्येही सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरील शहर भाजपमधील हे पहिले आऊटगोईंग आहे. दिवाळीनंतर असे अनेक फटाके फुटणार असल्याचे संकेत याअगोदरच मिळालेले आहेत. (Eknath Khadse supporters from Pimpri Chinchwad BJP join NCP)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत सारिका पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रेवश आज मुंबईत झाला. यावेळी एकनाथ खडसे, रक्षा खडसे हजर होते. या प्रवेशामुळे शहरात महिला राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. पक्ष मजबुतीवर आणि महिला एकजुटीवर भर देणार असल्याचे पवार या प्रवेशानंतर म्हणाल्या. कोरोनामुळे हा प्रातनिधिक असा निवडक प्रवेश असून येत्या काळात आणखी दोनशे, अडीचशेजण राष्ट्रवादीत येणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. पवार यांच्या महिला संघटनाचा पक्षाला फायदा होईल, असे खड़से यांनी यावेळी पाटील यांना सांगितले.

पवारांबरोबर भाजपच्या व्यापारी आघाडीचे माजी शहर सरचिटणीस प्रशांत बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते सायमंड डेव्हिड, महेंद्र पवार, हरीप्रसाद वाबळे आदींनीही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नाथाभाऊंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मूळच्या खान्देशातील असलेल्या खडसेंच्या कट्टर समर्थक सारिका पवार यांनी शहरातून पहिली सोडचिठ्ठी भाजपला दिली होती.त्यांनी आपले पद व सदस्यत्वाचाही राजीनामा लगेचच दिला होता.नाथाभाऊंचा संघर्ष माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून त्यांच्या सन्मानार्थ राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

नाथाभाऊ म्हणतील ती पूर्वदिशा असे सांगत त्यांनी त्याचवेळी राष्ट्रवादीतील प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर साडेसहा महिन्यांनी त्यांनी आज प्रवेश केला.मंडलाध्यक्ष ते महिला ओबीसी शहराध्यक्षा असा त्यांचा प्रवास भाजपमध्ये होता. मात्र, नाथाभाऊ समर्थक असल्याने गत पालिका निवडणुकीला त्यांचे तिकिट कापले गेले होते.नंतर, पक्षाची प्रथमच पालिकेत सत्ता येऊनही त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली नव्हती.त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे शहर महिला ओबीसी शहराध्यक्षपद अद्याप भरले गेलेलेच नाही.

२०१७ ला जसे पालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकपदाची टर्म संपताच भाजपमध्ये राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. त्याची पुनरावृत्ती यावेळी २०२२ च्या पालिका निवडणुकीलाही पुन्हा पहायला मिळणार आहे.यावेळी, मात्र राज्यात सत्ता असलेल्या राष्ट्रवादीत इनकमिंग होणार आहे. त्याव्दारे अनेकजण स्वगृही परतणार आहेत. शहराच्या दोन कारभारी आमदारांच्या मतदारसंघातून अधिक हे आऊटगोईंग तथा राष्ट्रवादीत घरवापसी होणार आहे. त्याचे संकेत या दोन्ही मतदारसंघातील दोन नगरसेवकांनी स्पष्टपणे दिले असून ते सध्या भाजपच्या कार्यक्रमातून गायब झालेले आहेत. त्यांच्याजोडीने अनेकजण ऐनवेळी पक्षांतराच्या तयारीत असून त्यातील काहींनी,तर अजित पवारांच्या गाठीभेटीही सुरु केल्या आहेत.

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in