Don't force to go to the depths of 'Dudhganga': Dattatreya Bharane | Sarkarnama

'दूधगंगा'च्या खोलात जायला भाग पाडू नका : दत्तात्रेय भरणे 

डॉ. संदेश शहा 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

इंदापूर तालुक्‍यातील दूधगंगा दूध सहकारी संघ कुणाच्या चुकीमुळे बंद पडला, त्यामुळे कुठल्या कर्मचाऱ्यांना आत्महत्या करावी लागली, याच्या खोलात आम्हास जाण्यास भाग पाडू नका, असा इशारा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिला. 

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील दूधगंगा दूध सहकारी संघ कुणाच्या चुकीमुळे बंद पडला, त्यामुळे कुठल्या कर्मचाऱ्यांना आत्महत्या करावी लागली, याच्या खोलात आम्हास जाण्यास भाग पाडू नका, असा इशारा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिला. 

दूध दरवाढीसाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पाटील यांनी दूग्ध विकास राज्यमंत्री भरणे यांनी दूधगंगा अवसायनात काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. त्याला राज्यमंत्री भरणे यांनी प्रतित्त्युर दिले आहे. 

भरणे म्हणाले, "विरोधकांच्या (हर्षवर्धन पाटील) ताब्यात असलेल्या नीरा-भीमा साखर कारखाना आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सरसकट सर्वांना सभासद करून घेतले जात नाही. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत. कर्मयोगी कारखान्याने शेतकऱ्यांना अद्याप उसाची संपूर्ण एफआरपी दिली नाही, असे आरोप त्यांनी केले.'' 

कोरोना सुरू झाल्यापासून चार महिन्यांत आपण तालुक्‍यातील प्रत्येक गावांत जाऊन ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट स्वखर्चातून वाटप केले. जिल्ह्यात सर्वाधिक 10 हजार बाटल्या रक्ताचे संकलन इंदापूर तालुक्‍यात केले. विरोधकांच्या बावडा गावातदेखील 750 लोकांना किट वाटप केले. मात्र, विरोधकांनी आपल्या गावातसुद्धा किट वाटले नाही. एक बाटलीसुद्धा रक्ताचे संकलन केले नाही. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. जे स्वतःला मेरीटमध्ये समजतात, त्यांचे दोनवेळा मेरीट घसरले आहे, असा टोला भरणे यांनी पाटील यांना लगावला. 

मी स्वतः शेतकरी असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आहे. लवकरच दुधासंदर्भात सकारात्मक निर्णय होणार आहे, असे सूतोवाच राज्यमंत्री भरणे यांनी केले. 

प्रसिद्धीची हाव कोणाला हे सर्वांना माहीत आहे 

तुम्हा सर्वांच्या, जनतेच्या आशीर्वादामुळे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत सोलापूरचा पालकमंत्री म्हणून श्री पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान मला मिळाला. या महापुजेची फोटोसहित प्रसिद्धी राज्य व देशात होत असते. आपण मात्र प्रसिद्धीसाठी प्रयत्न न करता केवळ पांडुरंगाचे आशीर्वाद घेतले. मात्र यापूर्वी मंत्री असलेल्या तालुक्‍यातील नेत्याने आपला चेहरा अनेक वर्षे पुढे केल्याचे फोटो अनेकांनी पाहिले आहेत. त्यामुळे प्रसिद्धीची हाव कोणाला आहे, हे इंदापूर तालुक्‍यात जनतेला माहिती आहे, अशी बोचरी टीका सामान्य प्रशासन राज्यमंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. 

इंदापूरच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी या वेळी प्रताप पाटील, अनिल राऊत, लक्ष्मण देवकाते उपस्थित होते. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख