सत्ताधारी भाजपशी अॅ़डजेस्ट होऊ नका; तिथं काय चालतं हे मला माहितीय : अजितदादांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना इशारा

उपमुख्यमंत्री असल्याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध कारवाई करा, असे एक पदाधिकारी म्हणताच दादांचा आवाज चढला.
Don't adjust to the ruling BJP; I know what's going on there : Ajit Pawar
Don't adjust to the ruling BJP; I know what's going on there : Ajit Pawar

पिंपरी  ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २ एप्रिल) पुण्यात आपल्या स्टाईलने शाळा घेतली. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी अॅ़डजस्ट न होता आक्रमक व्हा, सर्वांनी सभागृहात, स्थायी समितीत नागरिकांच्या हिताविरोधातील कामांविरुद्ध आवाज उठवा, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचे पुरावे गोळा करून ते द्या, मांडा, असा बूस्टर डोस अजितदादांनी या बैठकीत दिला.  

दरम्यान, दहा महिन्यावर आलेली महापालिका निवडणूक आणि दादांनी केलेली कानउघाडणी यामुळे येत्या काही दिवसांत शहरात काहीशी मवाळ झालेली राष्ट्रवादी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याला शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला. गटतट विसरून काम केले नाही, तर आता खैर नाही. त्यामुळे सभागृह व स्थायी समितीमध्ये गेली चार वर्षे मौन धारण केलेलेही आता बोलू लागतील, असे हे पदाधिकारी म्हणाले. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात विरोधी पक्षनेते आता नियमित पत्रकार परिषदा घेण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

प्रामाणिकपणे काम करा, पुन्हा सत्ता येईल, असे नवीन सर्किट हाऊस येथे पाऊण तास चाललेल्या बैठकीत सांगण्यासही अजितदादा विसरले नाहीत. आगामी पालिका निवडणुकीत दोन सदस्यांचा प्रभाग राहील, असे संकेत देत त्यादृष्टीने तयारीला लागण्याचा आदेशही त्यांनी दिले. महापालिकेत येत नसलो, तरी तेथे काय चालते, कोणाचे सत्ताधारी आमदाराशी भागीदारी आहे, कोणाला ठेका मिळतो, कोण टक्केवारी घेतो, याची सर्व माहिती असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे कान उपटले. 

चुकीच्या कामांना स्थायी समितीत आपल्या पक्षाचे सदस्य विरोध करीत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पदे दिलीत, तर त्याला न्याय देणारे काम करा, असेही त्यांनी बजावले. पवारसाहेबही दर महिन्याला आढावा बैठक घेतात आणि चांगले काम करणाऱ्याला शाबासकी, तर चुकीचे काम करणाऱ्याचे कान उपटतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मंगला  कदम, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, वैशाली काळभोर, संजय वाबळे, पंकज भालेकर, श्याम लांडे , मोरेश्वर भोंडवे यांच्यासह  नगरसेवक, नगरसेविका व प्रमुख पदाधिकारी या वेळी हजर होते.

उपमुख्यमंत्री असल्याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध कारवाई करा, असे एक पदाधिकारी म्हणताच दादांचा आवाज चढला. प्रथम तुम्ही तुमचे काम करा, विरोधकांची भूमिका पार पाडा, सताधाऱ्यांचे वाभाडे काढा, त्यांचा भ्रष्टाचार पुढे आणा, त्यांच्या चुकीच्या कामाविरुद्ध बोला, भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, आणखी आक्रमक व्हा, पालिका सभा, स्थायीच्या बैठकीपूर्वी पक्षाची मिटिंग घ्या, कशाला विरोध करायचा, त्यात ते ठरवा, असे बारीकसारीक डिटेल्स सांगत त्यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची शाळाच घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com