लोणी काळभोर, हडपसरसह सहा पोलिस ठाण्यांचे विभाजन; अजित पवारांच्या दालनात होणार शिक्कामोर्तब 

खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबाबत पुढाकार घेतलाआहे.
लोणी काळभोर, हडपसरसह सहा पोलिस ठाण्यांचे विभाजन; अजित पवारांच्या दालनात होणार शिक्कामोर्तब 
Division of six police stations including Loni Kalbhor, Hadapsar

उरुळी कांचन (जि. पुणे) : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलातील लोणी काळभोर, लोणीकंद, हवेली या तीन पोलिस ठाण्याबरोबरच पुणे शहर पोलिस दलातील हडपसर, चंदननगर व चतुःश्रुंगी या सहा पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी (ता. 4 जानेवारी) मंत्रालयात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान लोणी काळभोर, लोणीकंद, हवेलीसह वरील सहा पोलिस ठाण्यांच्या विभाजनाबरोबरच, सध्याचे लोणी काळभोर व नव्याने निर्माण होणारे वाघोली पोलिस ठाणे शहर पोलिस दलात सामाविष्ठ करण्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन करुन नव्याने निर्माण होणारे उरुळी कांचन पोलिस ठाणे मात्र ग्रामीन पोलिस दलातच राहणार असल्याचे या पत्रामुळे स्पष्ट झाले आहे. 

पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलातील लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन्ही पोलिस ठाणी शहर पोलिस दलात सामाविष्ठ होण्याबाबत मागील चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. मात्र आमदार अशोक पवार यांच्याबरोबरच पूर्व हवेलीतील अनेक राजकीय नेत्यांचा विरोध असल्याने, वरील निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबाबत पुढाकार घेतल्याने लोणी काळभोर, लोणी कंद, हवेली, हडपसर, चंदननगर व चतुःश्रुंगी या सहा पोलिस ठाण्याचे विभाजन होण्याबरोबरच लोणी काळभोर पोलिस ठाणे येत्या 26 जानेवारीपासून शहर पोलिसात सामाविष्ठ होण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. 

याबाबत जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलातील एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर, लोणीकंद, हवेली, हडपसर, चंदननगर व चतुःश्रुंगी या सहा पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याबाबत निर्णय झाला आहे. उद्याच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याबरोबरच लोणी काळभोर पोलिस ठाणे येत्या 26 जानेवारीपासून शहर पोलिस दलास जोडण्यात येणार आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन, नव्याने स्वतंत्र उरुळी कांचन पोलिस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. उरुळी कांचन पोलिस ठाणे मात्र ग्रामीण पोलिस दलातच राहणार आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन, नव्याने निर्माण होणारे वाघोली पोलिस ठाणे शहरात राहणार आहे. 

उरुळी कांचन, वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे ही बाब आनंदाची : आमदार अशोक पवार 

याबाबत आमदार अशोक पवार म्हणाले, लोणी काळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिसांवर कामाचा ताण वाढल्याने त्यांचे विभाजन व्हावे, यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. त्यास आता यश मिळाले आहे. उरुळी कांचन व वाघोली ही दोन स्वतंत्र पोलिस ठाणे अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात नागरिकरांना पोलिसांची सेवा चांगली मिळणार आहे. लोणी काळभोर व वाघोलीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बळ मिळणार आहे. वाहतूक कोंडी व गुन्हे कमी होणार, याबाबत दुमत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात सोमवारी सकाळी बैठक होणार असून बैठकीनंतरच याबाबत सविस्तर बोलेन. 

सध्याची पोलिस ठाणी (कंसात विभाजन होऊन नव्याने अस्तित्वात येणारे पोलिस ठाणी) ः लोणी काळभोर (उरुळी कांचन), लोणीकंद (वाघोली), हवेली (नांदेड), चतुःश्रंगी (बाणेर), हडपसर (काळेपडळ), चंदननगर (खराडी). 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in