अजितदादा म्हणतात, आपण कामं करतो ती एक नंबरच! - Deputy chief minister ajit pawar visited pimpari chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा म्हणतात, आपण कामं करतो ती एक नंबरच!

उत्तम कुटे
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झपाटा सर्वांना माहित आहे. एखाद्या कामातील चूक ते लगेच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतात.

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झपाटा सर्वांना माहित आहे. एखाद्या कामातील चूक ते लगेच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतात. प्रत्येक काम बिनचूक झालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. 'कोणतंही काम आपण एक नंबरच करतो,' असे सांगत त्यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्तालय राज्यात एक नंबरचे होईल, असे आश्वासन दिले. 

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलिस दल हायटेक कऱण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. शुक्रवारी तडीपार गुंडाचे लोकेशन ट्रॅक करून शहरातील गुन्हेगारांवर वॉच ठेवणाऱ्या एक्स ट्रॅकर या अॅपचे उदघाटन  अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पवार म्हणाले,  पिंपरी-चिंचवडला माझं झुकतं माप असतं. शहराचे सध्याचे पोलिस आयुक्तालय हे भाड्याच्या जागेत असल्याने चिखली येथे त्याला जागा दिली जाणार आहे. तिथे राज्यातील एक नंबरचे पोलिस आयुक्तालय करु. कारण आपण कामे करतो, ती एक नंबरच करायचा प्रयत्न असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आर. आर. पाटील यांचे बंधू, सहायक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यांचा पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. १२ वर्षे आबा गृहमंत्री असूनही त्यांचे बंधू राजाराम यांनी त्याचा कधी गैरफायदा घेतला नाही. दहा वर्षे त्यांनी साईड ब्रॅंचला काम केले. आबांसारखेच ते ही सदग्रहस्थ आहेत, असा गौरव पवार यांनी केला. 

वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन

कोरोना काळातील वाढीव वीजबिल वसुलीसाठी सरकारच्या सक्तीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड भाजपने आज महावितरणच्या पिंपरीतील शहर कार्यालयाला टाळे ठोकत हल्लाबोल आंदोलन केले. वीजबिल माफीचे आश्वासन न पाळता उलट वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला, तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.

महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. माजी खासदार अमर साबळे, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे,शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक संदीप वाघेरे, शितल शिंदे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, सुजाता पालांडे आदींनी त्यात सहभाग नोंदवला.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख