रमेश थोरात यांच्या उमेदवारीचे सुप्रिया सुळे मनावर घेणार का? 
Demand for giving opportunity to Ramesh Thorat in the Legislative Council

रमेश थोरात यांच्या उमेदवारीचे सुप्रिया सुळे मनावर घेणार का? 

दौंड तालुक्‍यात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावायची असतील तर माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांना विधान परिषदेत संधी मिळावी, अशी मागणी दौंड तालुक्‍याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

वरवंड : दौंड तालुक्‍यात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावायची असतील तर माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांना विधान परिषदेत संधी मिळावी, अशी मागणी दौंड तालुक्‍याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. 

या बाबत बापूराव सोलनकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र पाठविले आहे. दरम्यान, या मतदारसंघाच्या खासदार सुळे या थोरात यांच्या उमेदवारीचे मनावर घेणार का? असा प्रश्‍न आहे. 

पक्षाशी एकनिष्ठ 

सोलनकर म्हणाले, दौंड तालुका हा बारामती लोकसभा मतदार संघात येत असून हा तालुका कायमच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागे खंबीरपणे उभा आहे. दौंड विधानसभा मतदार संघात पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. या निवडणुकीत थोरात यांचा अगदी निसटता पराभव झाला. रमेश थोरात हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पडत्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. 

सहकारी संस्थांवर वर्चस्व 

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक, अध्यक्ष म्हणून रमेश थोरात अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे मोठ्या प्रमाणात करीत आहेत. तालुक्‍यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये त्यांनी कामे करून ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा अभ्यास आहे. तालुक्‍याच्या जडणघडणीत थोरात यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच सध्या तालुक्‍यात वेगवेगळ्या रूपात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पकडदेखील आहे. जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका, खरेदी विक्री संघ, बाजार समिती आदी संस्थांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. असे असतानाही तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे आहेत. याची खंत कार्यकर्त्यांना आहे. तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची अडवणूक होते, त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी रमेश थोरात यांनी संधी द्यावी, अशी मागणी सोलनकर यांनी केली आहे. 

प्रश्‍नांच्या सोडविणुकीसाठी संधी द्यावी 

सोलनकर म्हणाले, दौंड तालुक्‍यात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. ती मार्गी लागावी यासाठी तालुक्‍याला विधान परीषदेच्या माध्यमातून आमदार मिळाला पाहीजे. सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. तालुक्‍यातील जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्यपाल नियुक्त विधान परीषद सदस्य यांची निवड होत आहे. त्यामध्ये रमेश थोरात यांना विधान परिषदेत संधी मिळावी.

सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी 

तत्पुर्वी, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही पदाधिकाऱ्यांनी थोरात यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, रमेश थोरात यांना विधान परीषदेवर संधी दिल्यास तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढेल व कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळेल, अशी भावना सोलनकर यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in