आळंदीत प्रशासनाने पाच दिवसांत फिरवला आपलाच निर्णय 

आळंदी शहरातील व्यावसायिक दुकाने शुक्रवारपासून दिवसाआड सम विषम तारखेला सुरू ठेवली जाणार होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांतच नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने आपला आदेश फिरवला. सम विषम तारखेला दुकाने उघडण्याचा पूर्वीचा निर्णय बदलूनआता दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने उघडण्याचा आदेश लागू केला.
आळंदीत प्रशासनाने पाच दिवसांत फिरवला आपलाच निर्णय 
The decision to open shops in Alandi changed in five days

आळंदी  : आळंदी शहरातील व्यावसायिक दुकाने शुक्रवारपासून दिवसाआड सम विषम तारखेला सुरू ठेवली जाणार होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांतच नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने आपला आदेश फिरवला. सम विषम तारखेला दुकाने उघडण्याचा पूर्वीचा निर्णय बदलून आता दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने उघडण्याचा आदेश लागू केला. नगरपालिका आणि पोलिसांच्या या निर्णयामुळे आळंदीकर नागरिकांचा गोंधळ उडत आहे. 

आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी या पूर्वी समविषम तारखेला दुकाने चालू ठेवण्याचा आदेश काढला होता. मात्र शुक्रवारचा दिवस उजाडण्यापूर्वीच नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने पुन्हा समविषम तारखेला दुकाने चालू ठेवण्याऐवजी आता केवळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच दुकाने चालू ठेवण्यास सांगितले. खरे तर सम विषम तारखेला दुकाने चालू ठेवण्याच्या आदेशाचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र, अचानक बदल केल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. दुकाने उघडी ठेवण्याबाबत प्रशासनाने अचनाक भूमिका का बदलली याची चर्चा आता आळंदीत सुरू आहे. 

व्यापारी-प्रशासनाचे साटेलोटे? 

खरे तर लॉकडाउनचा फायदा सुरुवातीपासून काही लोकांनी प्रशासनाच्या सहकार्याने घेतल्याची चर्चा आळंदीत आहे. यात व्यापारी लॉकडाउन घोषित झाल्याबरोबर वस्तूंच्या किंमतीत वाढ केली होती. एका दिवसात किराणा मालाच्या भावात झालेली वाढ पाहून आळंदीकर अवाक झाले होते. प्रशासनाने यावर कोणतीच कारवाई केली नाही. स्थानिक व्यापारी असोसिएशननेही याबाबत पूर्वकल्पना दिली नाही. प्रशासनाने आता सम विषम तारखेचा आदेश बदलल्याने यामध्ये व्यापारी आणि प्रशासनाचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे. या पूर्वीही स्थानिक पातळीवर दोन दोन दिवस दुकाने बंद ठेवली. यात नागरिकांऐवजी व्यापाऱ्यांचा फायदा झाला. आजही संपूर्ण लॉकडाउन काळात शहरातील चहाची दुकाने आणि हॉटेल चालू आहेत. 

भाजीविक्रेते पुन्हा रस्त्यावर 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भाजीविक्रेते मोशी, भोसरी, पुणे भागात नियमित ये जा करत असल्याने संसर्ग होऊ नये; म्हणून रस्त्यावरचा भाजी बाजार बंद केला. शाळेचे मैदान, वाहनतळ आणि एसटी स्थानकाच्या जागेत भाजी विक्रेत्यांना बसवले. यामुळे वाहतूक सुरळित राहिली आणि रस्त्यावर गाड्या पार्क करण्याचे प्रमाण थांबले. मात्र गुरुवारपासून पुन्हा भाजी विक्रेते रस्त्यावर, पदपथावर बसू लागले आहेत. प्रशासनही यावर कारवाई करण्याऐवजी समर्थन करत आहेत. स्वःतच काढलेले आदेश प्रशासन निट राबवू शकत नसल्याचे आळंदीत दिसत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in