सोलापूरच्या पालकमंत्र्यांचा बोलण्यातील गोडवा कामात दिसेना !

गोड गोड बोलण्यातच भरणे यांच्या पालकमंत्रिपदाचे वर्ष सरले आहे.
Dattatreya Bharne's year as Guardian Minister of Solapur
Dattatreya Bharne's year as Guardian Minister of Solapur

सोलापूर  ः जबरदस्त इम्युनिटी पॉवरमुळे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आजपर्यंत कोरोनापासून दोन हात लांबच राहिले आहेत. पालकमंत्र्यांपेक्षा जास्त इम्युनिटी पॉवर किंवा थोडक्‍यात सहनशक्तीच सोलापूर जिल्ह्यात असल्याने कोरोनामुक्तीचे ढिसाळ नियोजन जिल्ह्याने सोसले आहे. भरणे यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदी संधी मिळून उद्या (गुरुवारी, ता. 22 एप्रिल) एक वर्ष पूर्ण होत आहे. कोरोनाचे संकट दुसऱ्यांदा भीषण झाले असताना तुम्ही पॉझिटिव्ह राहा, असे गोड गोड बोलण्यातच भरणे यांच्या पालकमंत्रिपदाचे वर्ष सरले आहे. अधिकारी, पत्रकार आणि नागरिकांना ‘पॉझिटिव्ह'चा सल्ला देणाऱ्या पालकमंत्री भरणे यांच्या काळात सोलापूरची प्रशासकीय यंत्रणा मात्र निगेटिव्हच राहिली आहे. 

 गरिब असो की श्रीमंत आज प्रत्येक जण मेटाकुटीला आला आहे. बेड आहे, तर व्हेंटीलेटर नाही आणि व्हेंटीलेटर आहे, तर ऑक्‍सिजन नाही. रेमडेसिव्हिरचा शोध संपण्यापूर्वीच डॉक्‍टर आता टोसिलीझुमाब, इटॉलीझुमाब इंजेक्‍शन सांगू लागले आहेत. आयुष्यात ज्या इंजेक्‍शनची नावे कधी ऐकली नव्हती ती इंजेक्‍शन आणायची कोठून? असा प्रश्‍न आज कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना पडला आहे.

आचारसंहिता म्हणजे जिल्हा वाऱ्यावरच सोडून द्यायचा का?

तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, आम्हाला फक्त इंजेक्‍शन द्या अशी आर्त हाक आज सोलापूरकर देत आहेत. आचारसंहितेमुळे पालकमंत्री भरणे यांना सोलापूरच्या कोरोनाकडे लक्ष देण्यास तांत्रिक अडचणी असतीलही परंतु आचारसंहितेपूर्वी काय नियोजन केले? आचारसंहिता म्हणजे जिल्हा वाऱ्यावरच सोडून द्यायचा का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सोलापूरला अनुभवी पालकत्व मिळते?

राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सोलापूर संवेदनशिल आणि महत्वाचा जिल्हा असल्याने सोलापूरच्या पालकमंत्रीपदी सुरुवातील दिग्गज व शिस्तप्रिय नेते दिलीप वळसे-पाटील यांची वर्णी लावण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी सोलापूरचे पालकमंत्रीपद सोडले. त्यानंतर सोलापूरची जबाबदारी डॅशिंग नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपविली. सोलापूरचे पालकमंत्रीपद घेतले आणि आव्हाड कोरोनाबाधित झाले. त्यामुळे अनपेक्षितपणे भरणे यांच्यावर सोलापूरची जबाबदारी पडली. सोलापूरसारखा मोठा जिल्हा हातळण्यात पालकमंत्री भरणे सपशेल अपयशी ठरले आहेत. गोड गोड बोलणे ऐकण्यातच सोलापूरकरांचे एक वर्ष गेले आहे, दुसरे वर्षही गोड गोड ऐकण्यातच जाते की सोलापूरला अनुभवी पालकत्व मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पहिल्या लाटेतील अनेक गोष्टी संशयास्पद

कोरोनाच्या पहिल्या लाटेचे संकट सर्वांसाठीच नवीन होते. हे संकट निपाटरण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. कोव्हिड सेंटरला जेवण पुरविण्याचे काम असो की कोरोना संदर्भातील अन्य कामे या त्यावेळी युध्द पातळीवर सुरु होती. पालकमंत्री भरणे माझे मामा आहेत, असे सांगून काही ठेकेदार भाच्यांनी महसूल, बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील अनेक गोष्टी संशयास्पद असल्याने माहिती मागविणारे अनेक अर्ज आता प्रशासनाकडे दाखल होऊ लागले आहेत. 

इंदापूरसाठी तरतूद करुन घेताना सोलापूरचा विसर

सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची धुरा वर्षानुवर्षे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर राहिल्याने पालकमंत्री कसे असावेत? याचे उदाहरण म्हणून आजही विजयसिंह मोहिते-पाटील यांचेच नाव घेतले जाते. सोलापूरचे शेवटचे स्थानिक पालकमंत्री म्हणून विजयकुमार देशमुख यांनी पाच वर्षे जबाबदारी सांभाळली. मंत्रीपदाचा कोणताही अनुभव नसतानाही देशमुख यांनी पालकमंत्री म्हणून बऱ्यापैकी काम केले. सोलापूरकरांची त्यांनी किमान उपेक्षा तरी होऊ दिली नाही. कोरोनामध्ये अपयशी ठरलेले पालकमंत्री भरणे जिल्ह्याच्या इतर विकासकामातही अपयशी ठरले आहेत. नुकतेच्या झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पालकमंत्री भरणे यांनी इंदापूर तालुक्‍यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मोठी तरतुद करुन घेतली. त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील एकाही उपसा सिंचन योजनेची त्यांना आठवण होऊ नये, ही जिल्ह्यासाठी शोकांतिका म्हणावी लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com