आमदारकीसाठी हर्षवर्धन पाटलांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्ली वाऱ्या केल्या

कोरोना महामारीच्या संकटकाळात इंदापूर तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधान परिषदेवर वर्णी लागावी, यासाठी दिल्ली, मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे वाऱ्या केल्या. उर्वरित काळ त्यांनी इंदापुरात घरात बसणे पसंत केले.
आमदारकीसाठी हर्षवर्धन पाटलांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्ली वाऱ्या केल्या
Dattatreya Bharane's criticism on Harshvardhan Patil

इंदापूर (जि. पुणे) : कोरोना महामारीच्या संकटकाळात इंदापूर तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधान परिषदेवर वर्णी लागावी, यासाठी दिल्ली, मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे वाऱ्या केल्या. उर्वरित काळ त्यांनी इंदापुरात घरात बसणे पसंत केले. 

विविध सहकारी संस्थांचे जाळे असतानाही त्यांनी जनतेस दमडीचीदेखील मदत केली नाही. त्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांचे दोन वेळा राजकीय कटिपतंग केले आहे. त्यामुळे विरोधकांनी पुतना मावशीच्या प्रेमाप्रमाणे जनतेविषयी कळवळा आणू नये, असा पलटवार सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केला. 

हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता. २८ जुलै) राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर कोरोना काळात सुरपाट्या खेळणे, पतंग उडविण्यावरून टीका केली होती. त्यास राज्य मंत्री भरणे यांनी बुधवारी (ता. २९ जुलै) प्रतित्त्युर दिले आहे. 

मंत्री भरणे म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कराव्या लागलेल्या संचार बंदीच्या काळात अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे जनसेवक म्हणून मागील चार महिन्यांपासून प्रत्येक गावांत गरजू कुटुंबाना जीवनोपयोगी अन्नधान्य किट वाटप केले. मात्र, ज्या जनतेच्या जोरावर विरोधकांनी वीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केले, ज्यांच्याकडे सहकारी संस्था आहेत, त्यांनी मात्र गोरगरीब जनतेला मदत न करता कोरोना काळात विधान परिषदेवर वर्णी लागावी; म्हणून भाजपच्या नेत्यांकडे वाऱ्या करत जनतेस वाऱ्यावर सोडले. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. 

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आम्ही १० हजार बाटल्या रक्त संकलन केल्याने अनेकांना जीवदान मिळाले. राज्यात रक्तसंकलन तसेच जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या ‘इंदापूर पॅटर्न’ चे कौतुक झाले. कोरोनाची भीती कमी व्हावी तसेच युवकांमध्ये उत्साह वाढवा; म्हणून सुरक्षित अंतर ठेवून सूरफाट्या खेळलो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांमार्फत सर्व उपाय योजना राबविल्या जात आहेत, त्यासाठी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका नियमितपणे घेतल्या जात आहेत. 

ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्या भागात जाऊन नागरिकांशी चर्चा केली आहे. रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित पुरवल्या आहेत. याउलट विरोधकांनी कोरोनाबाधित ठिकाणी न जाता नगरपरिषद व तहसील कार्यालयात कोणताही अधिकार नसताना बैठका घेऊन त्याची प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्धीची हाव कोणाला आहे, हे इंदापूर तालुक्यातील जनतेला २० वर्षांपासून माहिती आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका न करता विश्रांती घ्यावी, असा टोला दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in