जीवाशी खेळ; मागणी 45 हजार इंजेक्शनची अन् मिळाली केवळ 10 हजार...

इंजेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना अपेक्षित पुरवठाच होत नसल्याने रुग्णांची जीव टांगणीला लागला आहे.
जीवाशी खेळ; मागणी 45 हजार इंजेक्शनची अन् मिळाली केवळ 10 हजार...
Covid19 Stock of remdesivir injection in pune market exhausted

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांना इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. पुणे जिल्ह्याकडून काही दिवसांपूर्वी 45 हजार इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे. पण कालपर्यंत केवळ 10 हजार 20 इंजेक्शन मिळाली आहेत. इंजेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना अपेक्षित पुरवठाच होत नसल्याने रुग्णांची जीव टांगणीला लागला आहे.

राज्यात पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे दैनंदिन इंजेक्शनच्या गरजेच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. परिणामी, रुग्णालयेही हतबल झाली आहेत. प्रशासनाने कंपन्या, डिलरला थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरविण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रत्यक्ष पुरवठा कमी होत असल्याने रुग्णालयांकडून नातेवाईकांनाच इंजेक्शन आणण्याचा आग्रह धरला जात आहे. पण खुल्या बाजारात इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकही हताश झाले आहेत. आज अनेक नातेवाईकांनी इंजेक्शनसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या मारला. त्यांनी इंजेक्शनसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. 

त्यानंतर माध्यमांशी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनची 45 हजारची मागणी नोंदविण्यात आली आहे. आम्हाला 3 ते 4 दिवसांपूर्वी 6 हजार आणि त्यानंतर 3 हजार इंजेक्शन मिळाली. तर काल  सुमारे 1200 इंजेक्शन मिळाली आहेत. आम्ही सर्वांना समान पध्दतीने वाटप करत आहोत. बाजारात इंजेक्शनचा साठा संपला आहे. आम्ही उत्पादक कंपन्यांशी बोलत आहोत. पुढील 4 ते 4 दिवसांमध्ये परिस्थिती सुधारेल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. 

इंजेक्शनची चुकाचा वापरही थांबायला हवा. कोविड प्रोटोकॅालनुसार केवळ गंभीर रुग्णांनाच इंजेक्शन द्यायला हवे. आम्ही भरारी पथके नियुक्त केली आहेत. ही पथके विविध ठिकाणी जाऊन तपासणी करत आहेत. काही बेकायदेशीर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 

कंपन्यांचे उत्पादनच कमी

पहिली लाट ओसरू लागल्यानंतर रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केले होते. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात क्षमतेच्या 50 टक्केही उत्पादन होत नव्हते. परिणामी, संपूर्ण देशातच कमी प्रमाणात वितरण होत होते. पण मार्च महिन्यापासून देशात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे कंपन्यांवर अचानक भार वाढला आहे. उत्पादन क्षमता वाढविली जात असली तरी प्रत्यक्ष मागणी पूर्ण करणे सध्या शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

निर्यात थांबविली तरी परिस्थिती जैसे थे

केंद्र सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजूनही देशातील अनेक राज्यांमध्ये इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयांकडून गरज नसलेल्या रुग्णांनाही इंजेक्शन सुरू केले जात असल्याचा दावा केंद्र सरकारसह राज्यांकडूनही केला जात आहे. पण त्यावर सध्या कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंजेक्शनची तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. 

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in