विद्युतदाहिन्या झाल्या फूल्ल! कोरोना रुग्णांवर पारंपरिक अंत्यसंस्काराचा निर्णय

कोरोना मृतांचे अंत्यविधी फक्त विद्युतदाहिनीतच करण्याचे पिंपरी पालिकेचे नियोजन दिवसागणिक वाढत्या कोरोना बळींमुळे कोलमडून गेले आहे. त्यामुळे अशा मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने सुद्धा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाला आज नाईलाजाने घ्यावा लागला.
विद्युतदाहिन्या झाल्या फूल्ल! कोरोना रुग्णांवर पारंपरिक अंत्यसंस्काराचा निर्णय
Pimpri

पिंपरी : कोरोना मृतांचे अंत्यविधी फक्त विद्युतदाहिनीतच करण्याचे पिंपरी पालिकेचे नियोजन दिवसागणिक वाढत्या कोरोना बळींमुळे कोलमडून गेले आहे. त्यामुळे अशा मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने सुद्धा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाला आज नाईलाजाने घ्यावा लागला. त्याकरिता पालिका सरपण विनामूल्य देणार आहे. 

शहरात कोरोनाने मरण पावणार्यांची संख्या मोठी आहे. शुक्रवारी (ता. १६) ५४, तर गुरुवारी (ता.१५) ६१ जणांचे निधन झाले. त्यात काही पालिका हद्दीबाहेरील आहेत. त्यांच्यापैकी काहींवर शहरातील मोजक्या स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. कोरोना मृतांवर फक्त विद्युतदाहिनीत अंत्यविधी करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे या विद्युतदाहिन्यांवर मोठा ताण येत आहे. त्यातून एक नुकतीच बंद पडली होती. तसेच किमान दीड तास एका मृतदेहाच्या दहनासाठी लागत असल्याने सध्या  स्मशानभूमीत मृतदेहांनाही मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. परिणामी शहरातील स्मशानभूमीत सध्या शववाहिनीच्या रांगा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. 

या प्रतीक्षेमुळे परवा सकाळी कोरोनामुळे मरण पावलेल्या एका ज्येष्ठावर १८ तासांनंतर काल पहाटे पाच वाजता अंत्यसंस्कार झाले. शिवाय स्मशानभूमी कामगारांवर ताण येतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने अंत्यविधीची सोय असलेल्या शहरातील सर्वच स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पालिका आयुक्त राजेश पाटील यांना आज घ्यावा लागला. महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष अॅड नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. अंत्यविधीसाठी शहरातील स्मशानभूमीतील प्रतिक्षा यामुळे दूर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र,कोविड काळात कोविड संसर्गाने मृत झालेल्यांसाठीच ही सुविधा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
...
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in