PCMC चा अजब कारभार : एकाही कोरोना रुग्णावर उपचार नसताना सव्वा तीन कोटींचे बिल - Corruption in Pipanri-Chinchwad Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

PCMC चा अजब कारभार : एकाही कोरोना रुग्णावर उपचार नसताना सव्वा तीन कोटींचे बिल

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

कोरोनाचा एकही रुग्ण दाखल नसताना दोन कोरोना सेंटरला तीन कोटी १४ लाख रुपये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दिले, त्यामुळे सत्ताधारी भाजप गोत्यात आला आहे.

पिंपरी : कोरोनाचा एकही रुग्ण दाखल नसताना दोन कोरोना सेंटरला तीन कोटी १४ लाख रुपये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दिले, त्यामुळे सत्ताधारी भाजप गोत्यात आला आहे. यावरून विरोधी पक्ष शिवसेना व  राष्ट्रवादी आक्रमक झाली असून त्यांनी या प्रकरणातील दोषींविरुद्ध फौजदारी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा व प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा इशारा दिला आहे. 

भोसरीतील दोन कोविड सेंटरमध्ये एकाही कोरोना रुग्णावर उपचार झाले, नसतानाही ते चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलने पालिकेला सव्वापाच कोटी रुपयांचे बिल पाठवून दिले होते. मात्र, याबाबत करारनामाच झाला नसल्याने हे बिल देण्याची गरजच काय? अशी विचारणा करीत ते देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, ते रजेवर जाताच या बिलाच्या ६५ टक्के रक्कम म्हणजे तीन कोटी १४ लाख रुपये स्थायी समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच दिले. त्यामुळे या प्रकरणातील दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी भोसरीचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी केली आहे. कोरोना काळातील खरेदीतही मोठा घोटाळा झाला असून त्याचे ऑडीट करावे, असे ते म्हणाले. 

याबाबत उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना आपण पत्रही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदेशीरपणे हे बिल देण्यात आले असल्याने त्याची रक्कम वसूल करावी आणि हे गैरकृत्य करणा-या अधिका-यांचे निलंबन करुन त्यांच्याविरुद्ध फौजदारी करावी, अशी मागणी माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भातील खुलासेवजा माहिती मिळाली नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकाराला आयुक्तही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोरोना महामारीच्या संकटाचा फायदा घेऊन एकाही रुग्णावर उपचार न करताही कोट्यवधी रुपयांचे बिल घेणे म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केला. तीन कोटी १४ लाखाचे बिल चुकीच्या पद्धतीने दिल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात पाच रूपयांचे मास्क २० रूपयाला, ५०० रूपयांचे पीपीई किट ३,००० रूपयांना, १८० रूपयांचे जेवण व नास्ता ४०० रूपयांना अशारितीने साबणापासून सॅनिटाझरपर्यंत प्रत्येक गोष्ट निर्धारित किंमतीपेक्षा जास्त दराने खरेदी करत बिल देऊन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. 

याबाबत आयुक्त हे वेड घेऊन पेडगावला जात असल्याचे सगळ्यांना माहिती आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. दोन दिवसांत याचा खुलासा समक्ष केला नाही, तर शिवसेना पद्धतीने समजावू, तर रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर करून त्याचे पैसे घेणे हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी म्हटले आहे. कोरोना काळातील जमा खर्चाचा हिशेब देण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख