मृत्यूनंतरही फरफट; रुग्णवाहिका अन् स्मशानभूमीतही लूट

हिंजवडी आयटीत अकाउंटट असलेल्या पस्तिशीतील तरुण सामाजिक कार्यकर्त्याच्या अकाली निधनाने कोरोनाचे हे कटू सत्य पुन्हा अधोरेखित झाले.
मृत्यूनंतरही फरफट; रुग्णवाहिका अन् स्मशानभूमीतही लूट
Corona patients relatives are being robbed By ambulance driver

पिंपरी : बेडच न मिळणे, तो मिळाला तर ऑक्सीजन व  व्हेंटीलेटर उपलब्ध न होणे, बेड मिळताच रुग्णवाहिका चालकांकडून अवास्तव भाडे आकारले जाणे, त्यानंतर रुग्णालयात रेमडीसिवीर अभावी ते काळाबाजारातून घ्यावे लागणे याचा सामना सध्या कोरोना रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना पिंपरी-चिंचवड, पुण्यातच नाही तर राज्यभर करावा लागतो आहे. मात्र, मरण पावल्यांनंतही कोरोना रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची फरफट थांबत नाही. त्याचा पिंपरी चिचवडमध्ये दाहक अनुभव पुन्हा  काल (ता.२४) आला. त्यातून या महामारीतही काहींचा निगरगट्टपणा आणि स्वार्थी वृत्ती दिसून आली.

हिंजवडी आयटीत अकाउंटट असलेल्या पस्तिशीतील तरुण सामाजिक कार्यकर्त्याच्या अकाली निधनाने कोरोनाचे हे कटू सत्य पुन्हा अधोरेखित झाले. सामाजिक कार्याची मोठी आवड असलेला हा तरूण तापकीरनगर, काळेवाडीत राहत होता. त्या भागात रात्री, अपरात्रीही कुणाच्याही मदतीसाठी तो धावून जात असे. त्यामुळे त्याच्या अकाली मृत्यूमुळे हा परिसर  शोकसागरात बुडाला आहे. त्यातही इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार असलेल्या या तरुणाला मात्र कोरोना झाल्यावर आवश्यक ती मदत वेळीच न मिळाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यासाठी गेले तीन आठवडे पळापळ करणारा त्याचा मित्र शिवानंद ठाकर व त्याचे आईवडिल यांनी आपला शोक आवरून इतरांवर ही पाळी येऊ नये म्हणून ही आपबीती सांगितली.

स्थानिक नगरसेविका सुनीता तापकीर यांनी आपल्यापरीने त्याला यथोचित मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती फळाला न आल्याने त्यांनीही आपल्या प्रभागातील एक उमदा तरुण गमावल्याबद्दल अतिव दुख व्यक्त केले. मूळचा चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवासी असलेल्या या तरुणाला ६ एप्रिलला कोरोना झाला. बेड न मिळाल्याने त्याला पुणे पालिका हद्दीत दाखल करण्यात आले. मात्र, तेथे बेड नव्हता. त्यामुळे तेथे खुर्चीवर बसून त्याला ऑक्सिजन दिला गेला. तो मिळाला, तर रेमडीसिवीर मिळेना. सहाची गरज असताना चार रेमडीसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारातून घेण्यात आली. त्याचे आई-वडिल वयस्कर असल्याने ठाकर व त्याचे सहकारी धावपळ करीत होते. त्यांच्या धावाधावीला व प्रयत्नाला यश आले. 

चिंचवडला एका खासगी रुग्णालयात त्याला बेड मिळाला. मात्र, तेथील खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागताच त्याला औंध जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्याने हलविण्यात आले. तेथे प्लाझ्माची गरज भासली. त्यासाठीही पुन्हा मोठी धावपळ केली तेव्हा एक प्लाझ्मा भेटला. मात्र, ही सर्व धावपळ, प्रयत्न अखेर कामी आले नाहीच. शुक्रवारी रात्री (ता.२३) या तरुणाचे निधन झाले. मरणानंतरही या तरुणाचा मृतदेह, त्याचे आईवडिल व मित्रांची फरफट व लूट थांबली नाही. 

औंध जिल्हा रुग्णालय येथून काही किलोमीटरवर असलेल्या चिंचवड स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी साडेसहा हजार रुपये खासगी रुग्णवाहिका चालकाने काल सकाळी घेतले. प्रत्यक्षात ही सेवा मोफत मिळायला हवी होती. स्मशानभूमीतही या तरुणाच्या वयस्कर आईवडिलांना तब्बल पाच तास प्रतिक्षा करावी लागली. विद्युतदाहिनीत वेटिंग असल्याने पारंपारिक पद्धतीने तेथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. तर, त्यासाठी तेथील कामगाराने आठ हजार रुपयांची मागणी केली. यावर मात्र होते तेवढे पैसे व संयमही संपलेल्या ठाकर यांनी स्थानिक नगरसेविका सुनीता तापकीर यांच्या कानावर ही बाब टाकली. 

पालिकेने कोरोनाने मरण पावलेल्यांचे अंत्यविधी मोफत करण्याची घोषणा करूनही त्यासाठी पैसे मागितले जात असल्याने तापकीरांनी ही बाब थेट महापौर आणि आयुक्तांपर्यंत नेली. मग, चक्रे फिरली. पालिकेचे भरारी पथक स्मशानभूमीकडे निघाले. त्याची कुणकुण लागताच तेथील कामगारांनी सकाळी ११ पासून सहा तास थांबलेल्या या तरुणाचा मृतदेह लगेच अंत्यसंस्कारासाठी घेतला. नोकरी जाईल म्हणून तक्रार देऊ नका, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर एवढा मोठा दुखाचा डोंगर कोसळूनही या तरुणाचे मित्र व आईवडिलांनी हे प्रकरण पुढे लावून धरले नाही व त्यामुळे त्यांच्या मृत मुलावर मोफत अंत्यसंस्कारासाठी पैसे मागणाऱ्यांवरही त्यांनी दया दाखवल्याने त्यांची नोकरी वाचली.

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in