हृदयद्रावक : आंबेगावात कोरोनाने सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

आई-वडील कोरोनातून सुखरूपपणे बाहेर पडले.
हृदयद्रावक : आंबेगावात कोरोनाने सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू
Corona has caused the death of a sibling in Pune district

पारगाव : कुटूंबातील एखाद्या सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संपूर्ण कुटूंबालाच विळखा पडत असल्याची अनेक उदाहरण समोर आली आहेत. कोरोनाने एकाच कुटूंबातील दोन-तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे. अवसरी ब्रुद्रुक येथील सख्ख्या बहीण-भावाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. (Corona has caused the death of a sibling in Pune district)

माधवी (वय 31) आणि मयूर बाळासाहेब हिंगे पाटील (वय 29) या दोघांना कोरोनानं हिरावून नेलं आहे. त्यामुळं हिंगे पाटील कुटूंबासह संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे. माधवीच्या मृत्यूनंतर मयूरचा शनिवारी अकराव्या दिवशी मृत्यू झाला आहे. मयूर हा संगणक अभियंता होता. तर माधवीने ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्राची पदवी घेतली होती. आई-वडीलांसह या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे 15 दिवसांपूर्वीच स्पष्ट झालं होतं. 

आई-वडील कोरोनातून सुखरूपपणे बाहेर पडले. पण माधवी व मयूरला कोरोनाचा संसर्गाने अधिक तीव्र लक्षणे जाणवू लागली. त्यामुळं त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. सुरूवातीला माधवी हे जग सोडून गेली. शुक्रवारी (ता. 28) द्रशक्रिया विधी होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मयूरच्या निधनाची बातमीही धडकली. त्यामुळं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब हिंगे हे शेतकरी असून आई मंगल या आंबेगाव येथे अंगणवाडी केंद्र प्रमुख आहेत. 

करमाळ्यात बापलेकाचा मृत्यू

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब सुर्वे (वय 55, रा. कुंभेज, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचे २५ मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांचे पुत्र तात्यासाहेब सुर्वे (वय ३०) यांचाही शनिवारी (ता. २९ मे) कोरोनाने बळी घेतला. अवघ्या चार दिवसांतच घरातील दोन कर्ते पुरुष कोरोनामुळे दगावल्याने सुर्वे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांवर वसई येथे उपचार सुरू होते. 

कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर नानासाहेब सुर्वे आणि तात्यासाहेब सुर्वे यांना त्यांच्या नातेवाइकांनी वसई येथे उपचारासाठी नेले होते. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेली. वसईच्या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २५ मे रोजी नानासाहेब यांचा मृत्यू झाला, तर त्यानंतर अवघ्या चार दिवसांत २९ मे रोजी तात्यासाहेब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तात्यासाहेब यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. बापलेकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नानासाहेब सुर्वे हे करमाळा तालुक्यातील प्रतिष्ठीत राजकारणी होते. त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. तालुक्याच्या राजकारणात त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याबरोबर काम केले होते. सध्या ते माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे काम करत होते.

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in