बारामती तालुक्‍यात पुन्हा चिंकाराची शिकार  - Chinkara hunting again in Baramati taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

बारामती तालुक्‍यात पुन्हा चिंकाराची शिकार 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 9 जून 2020

बारामती तालुक्‍यातील जैनकवाडी येथील पवार वस्ती परिसरातील वन परिक्षेत्रात चिंकारा हरणाची शिकार झाली आहे. पार्टीसाठी या चिंकाराची शिकार झाल्याचा संशय आहे. या वेळी काही जागरूक नागरिकांनी वेळीच लक्ष दिल्याने संबंधितांचा चिंकारा पार्टीचा बेत हुकला. मात्र, चिंकाराला आपला जीव गमवावा लागला.

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्‍यातील जैनकवाडी येथील पवार वस्ती परिसरातील वन परिक्षेत्रात चिंकारा हरणाची शिकार झाली आहे. पार्टीसाठी या चिंकाराची शिकार झाल्याचा संशय आहे. या वेळी काही जागरूक नागरिकांनी वेळीच लक्ष दिल्याने संबंधितांचा चिंकारा पार्टीचा बेत हुकला. मात्र, चिंकाराला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून काही वर्षांपूर्वी गाजलेल्या धर्मरावबाबा आत्रम यांच्या शिकार प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. 

या बाबत वन विभागाने माहिती मिळताच कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशशित आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींमधून होत आहे. जैनकवाडी येथील पवार वस्तीच्या परिसरात सोमवारी (ता. 8) शेतकरी आपली कामे करीत असताना त्यांना एक जखमी चिंकारा हरणाची शिकारी कुत्रा पाठलाग करताना दिसले. त्याच्या मागे एक व्यक्ती पळत होता. त्या हरणाला ठार मारून कुत्रा बाजुला झाला. त्यावेळी संबंधित व्यक्तीला शेतकऱ्याने हटकले असता त्याने दमबाजी केली. या वेळी परिसरातील नागरिक जमा झाल्याने शिकाऱ्याने तेथून पळ काढला. या घटनेचे मोबाईल चित्रीकरणही करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

या नागरिकांच्या म्हणण्यानुसार आणखी चार ते पाच जण शिकारीसाठी जाळे लावून बसल्याचे पाहिले. विशेष बाब म्हणजे हा प्रकार सकाळी अकराच्या दरम्यान घडला. याबाबतची माहिती बारामती वनविभागाला मिळताच दुपारी बाराच्या दरम्यान त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून संबंधितांवर वन पशुहत्या गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी, सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव, बारामतीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल टी. जे. जराड, वनरक्षक श्रीमती कवितके, वनमजूर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बारामतीमधील यापूर्वीचे चिंकारा प्रकरण खूप गाजले होते. यामुळे संबंधितांना तत्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींमधून होत आहे. 

शेतकऱ्याच्या धाडसाचे कौतुक 

पुण्यासह बारामती, फलटण, इंदापूर या भागातील लोक शिकारीसाठी येत असल्याचे बोलले जाते. त्यात स्थानिक नागरिकदेखील कमी नाहीत. शिकारी कुत्र्यांच्या मदतीने ससे, घोरपड, हरीण यांची शिकार होत असते. तसाच काहीसा प्रकार येथे घडला असावा, अशी शक्‍यता स्थानिकांनी व्यक्त केली. जीव धोक्‍यात घालून चिंकाराला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच चित्रिकरण करुन वाचा फोडणाऱ्या शेतकऱ्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. 

बारामती तालुक्‍याच्या शिर्सुफळ, पारवडी, साबळेवाडी, गाडीखेल, जैनकवाडी, उंडवडी, जराडवाडी, गोजूबावी या भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामुळे या भागात चिंकारा जातीच्या हरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. वन्य प्राण्यांची शिकार करणे हा गुन्हा आहे. यामध्ये दंडासह शिक्षेची तरतुद आहे. यामुळे संशयित आरोपींचा पोलिसांच्या मदतीने शोध सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. 

-राहुल काळे, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख