लोणीत काळभोरांचे दोन्ही गट म्हणतात, 'सत्ता आमचीच' 

दोन्ही मातब्बर गटांनी निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड व भेद या नीतीचा वापर केल्याचे दिसून आले.
लोणीत काळभोरांचे दोन्ही गट म्हणतात, 'सत्ता आमचीच' 
Both groups claim victory in Loni Kalbhor Gram Panchayat elections

उरुळी कांचन (जि. पुणे) : प्रचारादरम्यानच्या दोन गटांतील हाणामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कोणाची येणार? याचा उद्या (सोमवारी, ता. 18 जानेवारी) दुपारी फैसला होणार आहे. पण, मतदान झाल्यापासून गावातील दोन्ही गटाकडून ग्रामपंचायतीवर सत्ता आमचीच येणार, असा दावा केला जात आहे. 

दरम्यान, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा सभागृहात होणार आहे. 

लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाची सत्ता येणार असा दावा यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोघांनीही केला आहे. सतरा ग्रामपंचायत सदस्यांच्या ग्रामपंचायतीत तेरा-चार अथवा बारा-पाच असा एकतर्फी विजय मिळवू, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. 

दुसरीकडे, सत्ता कोणत्याही गटाची आली तरी, मतमोजणीनंतर गावात कोणत्याही प्रकारचा राडा होऊ नये, यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, ऊरूळी कांचन, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, भवरापूर व तरडे या अकरा ग्रामपंचायतीची मतमोजणी उद्या होणार आहे. लोणी काळभोर वगळता उर्वरीत दहा ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत पार पडली. मात्र, लोणी काळभोरमध्ये प्रचारादरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी झाली. मतदानाच्या दिवशीही हद्दीबाहेरील मतदानावरुन दोन गटांत बाचाबाची झाली होती. त्यामुळे लोणी काळभोर ग्रामपंचातीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर सध्या प्रशांत काळभोर गटाची सत्ता आहे. ही सत्ता उलटवून टाकण्यासाठी माधव काळभोर यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष काशिनाथ काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर यांच्या मदतीने परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणुक लढविली आहे.

ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रशांत काळभोर यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गायकवाड व लोणी काळभोरचे माजी सरपंच शरद काळभोर यांच्या माध्यमातून अष्टविनायक पॅनेलच्या माध्यमातून निवडणुक लढविली. दोन्ही मातब्बर गटांनी निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड व भेद या नीतीचा वापर केल्याचे दिसून आले. 


निवडणूक एकतर्फी जिंकणार : माधव काळभोर 

परिवर्तन पॅनेलचे प्रमुख माधव काळभोर म्हणाले, "प्रचारादरम्यान मतदारांचा मिळालेला प्रतिसाद व ग्रामपंचायतीसाठी झालेले मतदान लक्षात घेता, ग्रामपंचायतीवर आमच्या गटाची सत्ता एकतर्फी येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विरोध पॅनेलच्या प्रमुखांनी विजयाचा दावा केला असला तरी, आमच्या गटाचे सतरापैकी तेरा ते चौदा सदस्य मोठ्या फरकाने विजयी होतील, असा आमचा विश्वास आहे. उर्वरीत उमेदवारही निसटता विजय मिळवतील, असे वाटते.'' 

मतदारांना आम्ही हवेत, त्यामुळे सत्ता आमचीच येणार : प्रशांत काळभोर 

अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख प्रशांत काळभोर म्हणाले, मागील पाच वर्षांत केलेली विकास कामे व प्रचारादरम्यान मतदारांनी दिलेला प्रतिसाद पाहता ग्रामपंचायतीवर आमचीच सत्ता येणार यात कसलाही संशय नाही. विरोधकांनी हद्दीबाहेरून मतदार आणून आमच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनाच आम्ही हवे असल्याने, आमचे बारा ते तेरा सदस्य निवडून येतील, असा विश्वास आहे. 


बावीस जण तडीपार; लोणीत जमावबंदी 

प्रचारादरम्यान दोन गटांत झालेली बाचाबाची लक्षात घेऊन मतमोजनीनंतर पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी चोख उपाय योजना केल्या आहेत. प्रचारादरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही गटातील बावीस जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल करुन बावीस जणांना मंगळवारी (ता. 19 जानेवारी) पहाटेपर्यंत लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायत हद्दीत जमावबंदी आदेश लागू करण्याबरोबरच, पोलिस यंत्रणा जागोजागी अलर्ट ठेवण्यात आली आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in