पुणे : रुग्णाला तातडीने औषधांची गरज असल्याचे सांगून त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ताे डॉक्टर देशपांडे बोलत असल्याचे सांगून ससून रुग्णालयातील नातेवाईकांची फसवणूक करत होता. मागील काही दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
ससून रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची अशाप्रकारे लूट होत असल्याचे 'सरकारनामा'ने उजेडात आणले होते. फसवणूकीचे प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयात प्रशासनाकडून बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने नातेवाईकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तपास केल्यानंतर अमित जगन्नाथ कांबळे (वय.34, रा.नवी पेठ) याला अटक केली.
कांबळे याच्यावर फसवणूकीचे 21 गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असून मागील 10 वर्षांपासून अशाप्रकारचे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारे अनेक लोकांना गंडा घातला आहे. ससूनमधील फसवणूकप्रकरणी बंडगार्डन व समर्थ पोलिस ठाण्यात असे दोन गुन्हे दाखल आहेत.
ब्रिजेश उमाशंकर तिवारी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार केली आहे. त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कांबळे याने त्यांना फोन करून डॉक्टर बोलत असल्याचे सांगितले. मुलाला तातडीने तीन इंजेक्शन द्यावी लागणार असून 22 हजार रुपयांची मागणी केली. ही इंजेक्शन कमी दरात उपलब्ध करून देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले. कांबळे याने विजय गुदले यांचीही फसवणूक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून कांबळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या गुन्हांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
... असे मिळवायचा मोबाईल क्रमांक
रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक मिळविण्यासाठी संबंधित वॉर्डात फोन केला जातो. आरएमओ बोलतोय असे सांगून परिचारिकांकडून रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईंकांचे मोबाईल क्रमांक मागितले जातात. आरएमओचा फोन असल्याने परिचारिकाही माहिती देतात. त्यानंतर मग संबंधित बोगस डॉक्टर नातेवाईकांना फोन करून पैसे पाठविण्यास सांगतात.
दरम्यान ससून रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचा यामध्ये समावेश असतो. रुग्णालयामध्ये बहुतेक उपचार मोफत केले जातात. तसेच काही शस्त्रक्रिया, तपासण्या व उपचारांचा खर्चही अत्यंत कमी असतो. रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर होणारे उपचारही मोफत असतात. त्यामुळे गरजू रुग्णांचा ओढा ससून रुग्णालयाकडे असतो. पण या रुग्णांना लुटण्याचाच प्रकार समोर आला आहे.
रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधांसाठी पैसे पाठविण्याची मागणी करणारे फोन आणखी काही जणांना आल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाला इंजेक्शनसाठी सात हजार रुपये गुगल पेद्वारे पाठविण्यास सांगण्यात आले. संबंधित नातेवाईकांनी परिचारिकांकडे याबाबत विचारले असता त्यांनी असे कोणतेही इंजेक्शन लागत नसल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने आरएमओ देशपांडे अशी आपली ओळख सांगितल्याची तक्रार परिचारिकेने ससून रुग्णालय प्रशासनाकडे केली होती.
रुग्णालयातील एका डॉक्टरांच्या नातेवाईकांनाही असाच फोन आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना औषधांसाठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. संबंधित नातेवाईकाने याबाबत माझ्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा बोगस डॉक्टर असल्याचे समजले. या बोगस डॉक्टरमुळे ससून रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. असे फोन आणखी किती जणांना करण्यात आले आहेत, याबाबत माहिती नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून पैसे पाठविण्यास सांगितल्यास त्यांची तक्रार करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
Edited By Rajanand More

