सोमेश्वरनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झाले होते. मात्र, पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालांच्या पार्श्वभूमीवर हा नेता घरवापसी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या पुरंदर तालुकाध्यक्षांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात वर्षानुवर्ष राष्ट्रवादीचे काम करणारे अनेक नेते आमदारकीसाठी इच्छुक होते. अशात माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांचीही स्पर्धेत एंट्री झाली होती. मात्र, पुरंदर तालुका जागावाटपात काँग्रेसकडे गेला आणि सगळ्यांच्या अपेक्षा म्यान झाल्या. जालिंदर कामठेंनी मात्र २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप प्रवेश केला होता.
वास्तविक कामठे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्याच बंगल्यात १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. संस्थापक नेत्यानेच रामराम केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राष्ट्रवादीकडून त्यांनी जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष अशी पदे भूषविली होती. त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष असताना आंदोलनात जिल्हाभरात चाळीस-पन्नास गुन्हेही दाखल झाले होते. तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे, दादा जाधवराव यांना थेट अंगावर घेण्याची धमक त्यांनी दाखविली होती.
भाजपत जाताना मात्र त्यांनी, 'जिल्ह्यातील काही चांडाळ चौकडीला कंटाळून भाजपत जात आहे' असे त्यांनी जाहिररीत्या स्पष्ट केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकांचा कामठेंसह सगळ्यांचाच अंदाज चुकला आणि शरद पवार यांच्या प्रभावामुळे कुणाच्या कल्पनेतही नसलेले महाआघाडी सरकार स्थापन झाले. आणि भाजपत गेलेल्यांवर नाराजीची वेळ आली. 'आयात' नेतेमंडळींना भाजपकडूनही फारसे बळ मिळताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा घरवापसीला ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अनेकांची घरवापसी होणार असे सूचित केले आहे.
जालिंदर कामठे हे सध्या भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीत आहेत. मात्र, फारकत घेतली असली तरी पवार कुटुंबाशी असणारा त्यांचा स्नेह टिकून आहे. काडीमोड घेतल्यावरही त्यांनी त्यांच्यावरील टीका टाळली होती. त्यामुळे तेही परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा होत होती.
सध्या पुरंदर तालुक्यात माजी आमदार अशोक टेकवडेंसारखे काही अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या बड्या नेतेमंडळींचा गावातच पराभव झाला आहे. बदललेल्या सत्तासमीकरणांचा पक्षाला फटका बसत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर कांचन निगडे या राष्ट्रवादीच्या माजी युवक उपाध्यक्षांनी ‘भाऊ परत या’ अशी साद कामठे यांना थेट समाजमाध्यमातून साद घातली होती. त्याला प्रतिसाद मिळत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही त्यांनी पुरंदरमधील पक्षाच्या परिस्थितीबद्दलचे पत्र लिहिले. संवेदनशील वातावरणातच या बाबी 'व्हायरल' झाल्या आहेत. कामठे यांनाही राष्ट्रवादीतून अनेक फोन गेले. यामुळे कामठे यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या पुरंदर तालुकाध्यक्षांनीही यास दुजोरा दिला आहे.
सरकारनामाशी बोलताना कामठे यांनी ‘ग्रामपंचायत निकालांच्या पार्श्वभूमीवर मला अनेक फोन आले आहेत. कांचन निगडे यांच्या भावनाही समाजमाध्यमातून पसरल्या. तूर्तास मी आहे तिथे व्यवस्थित आहे,’’ असा पवित्रा घेतला. राष्ट्रवादीत येणार का? या प्रश्नावर, ‘‘पाहूया. सध्या काही प्रतिक्रिया द्यायची नाही,’’ असे संदिग्ध उत्तर दिले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी, ‘‘कामठेंच्या घरवापसीबाबत वरीष्ठ पातळीवर विचारविनिमय चालू आहे. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला खूप चांगल्या जागा प्राप्त झाल्या,’’ अशी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कांचन निगडे यांनी ‘‘तालुक्यातील नव्या सत्ता समीकरणांचा पक्षाला फटका बसत आहे. अशा स्थितीत जालिंदरभाऊंसारखा आक्रमक नेता पुन्हा पक्षाला हवा आहे. ते पक्षाचे संस्थापक सदस्य होते आणि आजही पवार कुटुंबाशी त्यांचा स्नेह कायम आहे. त्यामुळे ते निश्चित परत येतील."

