भाजप म्हणतोय, प्रशासकावरून गावगाडे राजकीय आखाडे बनवू नका 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाआघाडी सरकारने पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा घेतलेला राजकीय निर्णय गावागावांत भांडणे लावण्याचा प्रकार आहे. विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
BJP says don't make villages political arenas from administrators
BJP says don't make villages political arenas from administrators

शिक्रापूर (जि. पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाआघाडी सरकारने पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा घेतलेला राजकीय निर्णय गावागावांत भांडणे लावण्याचा प्रकार आहे. विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आणि जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

दरम्यान, हा विषय राज्यस्तरीय असून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे याबाबत राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या अधिसूचनेनुसार मुदत संपलेल्या राज्यातील सुमारे बारा हजार ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमणुकीस राज्यभर वेग आला आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे सर्व अधिकार त्या - त्या पालकमंत्र्यांना दिले आहेत. या निर्णयाला राजकीय वास येऊ लागला आहे. संबंधित राजकीय पक्षाचा प्रशासक नेमून गावागावांत मनमानी कारभार सुरू होईल. प्रशासक नियुक्‍त्यांवरून गावे राजकीय आखाडा बनण्याचा धोका आहे. 

गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व सरपंचांनी कोरोनाची स्थिती अत्यंत संवेदनशीलपणे हाताळली आहे. त्यांना या कामाचा अनुभव असून गावगाडा चालविण्याचा त्यांचा अनुभव प्रशासक म्हणून नियुक्त होताना गावासाठी कामाला येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासक नेमण्याच्या बाबतीत निश्‍चित धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यमान सरपंचांनाच संधी द्यावी. अथवा शक्‍य असल्यास प्रशासनातील कुणाही जबाबदार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपने केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे. 

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही निवेदन देण्यात आले आहे, असे भेगडे यांनी सांगितले. 


नेत्यांची लागणार कसोटी 

जिल्ह्यातील 750 गावांतील प्रशासक नियुक्तीच्या संदर्भात इच्छुकांची यादी महाआघाडीतील तीनही पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी बनविल्या आहेत. या याद्या दोनच दिवसांत जिल्हाध्यक्षांकडे देऊन त्या तत्काळ अंतिम करण्याची सूचना तीनही पक्षांच्या नेत्यांकडून दिली आहे, असे आघाडीतील एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने दिली. कॉंग्रेसचा प्रभाव असलेल्या इंदापूर, पुरंदर व भोर वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांत राष्ट्रवादी-शिवसेना या दोन पक्षांचेच बहुतांश सरपंच आहेत. मात्र, स्थानिक राजकारणामुळे अनेक गावांमध्ये सरपंचांवर पक्षीय शिक्का नसल्याने अशा गावांत फक्त वाद होऊ शकतो. मात्र, या निमित्ताने गावातील एकाचेच नाव प्रशासक म्हणून निवडताना तीनही पक्षांच्या नेत्यांची कसोटी लगणार आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com