भाजप आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘कोरोनाच्या प्रकोपापुढे मी हतबल झालो आहे’

मी व माझ्या टीमचे प्रयत्न सध्या तोकडे पडू लागले आहेत.
भाजप आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘कोरोनाच्या प्रकोपापुढे मी हतबल झालो आहे’
BJP MLA Mahesh Landage says, 'I am helpless in the face of Corona's outbreak

पिंपरी  ः पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याने प्रत्येकाला मदत करण्याची इच्छा असूनही ती देऊ शकत नाही, अशी अगतिकता भारतीय जनता पक्षाचे भोसरीचे पहिलवान आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त करीत पिंपरी-चिंचवडकरांची माफी मागितली आहे. रेमडेसिव्हीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षाकडून प्रतिसादच मिळत नसल्याच्या शेकडो तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महेश लांडगे स्वतः व त्यांचे कुटुंबीयही या आजारातून गेले असल्याने या साथीची त्यांना चांगलीच जाण आहे. रेमडेसिव्हीर, बेड, रुग्णवाहिकेसाठी शेकडो फोन दररोज येत असल्याने मी व माझ्या टीमचे प्रयत्न सध्या तोकडे पडू लागले आहेत. त्यामुळे मी व माझी टीमही हतबल झाली आहे, अशी फेसबुक पोस्ट टाकत महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांच्या रक्षणासाठी आता परमेश्वरालाच साकडे घातले आहे.

मुंबईसारख्या मेट्रो शहरात रेमडेसिव्हिर आणि बेडची कमतरता आहे. तिथे ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल, याचा विचार अस्वस्थ करतो आहे, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कशी कोंडी झाली आहे, हे विशद करताना ते म्हणतात, जिल्हाधिकाऱ्यांचा कंट्रोल रूम त्यांना प्रतिसाद देत नाही. दुसरीकडे, रुग्णालय प्रशासन रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आपली जबाबदारी झटकत आहे. तर, मेडिकल स्टोअरवाले त्याचा स्टॉक संपला, असे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगत आहेत.

शहरात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. परिणामी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाहीत. बेड मिळाला तर रेमडेसिव्हीर मिळत नाहीत. मदतीसाठी एवढे फोन येत आहेत की ती करताना आमचे हात तोकडे पडू लागले आहेत. सर्वांना मदतीची इच्छा असूनही ती करता येत नाही, अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे तूर्त आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरवासियांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in