पंढरपुरातील भाजपच्या विजयाची जबाबदारी बाळा भेगडे यांच्या खांद्यावर  - BJP hands over responsibility for Pandharpur by-election to Bala Bhegade | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पंढरपुरातील भाजपच्या विजयाची जबाबदारी बाळा भेगडे यांच्या खांद्यावर 

उत्तम कुटे 
बुधवार, 31 मार्च 2021

खडकवासला मतदारसंघाचा दाखला देत सहानुभूतीची लाट पंढरपूर-मंगळवेढ्यातही चालणार नसल्याचे भेगडे यांनी सांगितले.

पिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत बदल नक्की होणार असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी होणार असल्याचा दावा पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी, माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला. या पोटनिवडणुकीची जबाबदारी भाजपने भेगडे यांच्यावर टाकल्याने ते मतदारसंघात तळ ठोकून आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा प्रभारी असल्याने भेगडे हे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. उमेदवार निवडीतही त्यांचा मोठा वाटा होता. अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच ते प्रचारातही उतरले आहेत. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ यांना राष्ट्रवादीने, तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. 

हेही वाचा  :  अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आवताडेंनी गाठला अकलूजचा शिवरत्न बंगला 

भारतनानांच्या निधनाची सहानुभूती त्यांच्या मुलाला मिळणार नाही का? असे विचारले असता खडकवासला मतदारसंघाचा दाखला देत सहानुभूतीची लाट पंढरपूर-मंगळवेढ्यातही चालणार नसल्याचे भेगडे यांनी सांगितले. खडकवासला मतदारसंघापेक्षा पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघात येणाऱ्या तालुक्‍यांत राज्य सरकारविषयी मोठा रोष असल्याचे कारण त्यांनी त्यासाठी दिले. त्यातून बदल हा नक्की घडणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

आमचा उमेदवार इंजिनिअर असून तो नवखा नाही. निवडणुका लढविण्याचा अनुभव त्याला असल्याने तो विजयी होणार असल्याचे भेगडे यांचे म्हणणे आहे. विरोधी उमेदवाराच्या उणीवा न सांगता तसेच त्यांच्यावर टीका न करता आपला उमेदवार कसा सरस आहे, हे आम्ही दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, सदाभाऊ खोत, रामदास आठवले आणि विनायक मेटे येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आवताडे हे जनतेच्या मनातले उमेदवार असून त्यांचा दामाजी परिवार आणि परिचारकांचा पांडुंरग परिवार एकत्र आल्याने आमचा विजय नक्की असल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला. 

या पोटनिवडणुकीतील प्रचाराचा रोख हा राज्य सरकारवर राहणार असल्याचे संकेत भेगडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या हल्लाबोलमधून मिळाले. ते म्हणाले,""हे जनतेचे सरकार नसून स्वःताची दुकाने थाटण्यासाठी आलेल्यांचे आहे. कोरोना, मराठा आरक्षण, चक्री वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस यात ते सपशेल अपयशी ठरले आहे.

माणुसकीला काळीमा फासणारे मनसुख हिरेन प्रकरण त्यांच्यात काळात घडले आहे. महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या हप्ता गोळा करून ते दरोडा टाकत असेल, तर कसे चालेल. फोन टॅपिंग प्रकरण, बदल्यांचा घोटाळा अशा प्रत्येक गोष्टीत घोटाळा करणारे हे सरकार आहे. ते टिकेल की नाही यामुळे त्यातील प्रत्येकजण वसुलीच्या मागे लागलेला आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख