दुकानांच्या वेळा वाढवण्यासाठी आता पुणे-पिंपरीचे महापौरच उतरले मैदानात 

एकूणच दुकानांची वेळ वाढवून देण्यासाठी शासन, प्रशासनावरील दबाव वाढत चालला आहे.
दुकानांच्या वेळा वाढवण्यासाठी आता पुणे-पिंपरीचे महापौरच उतरले मैदानात 
Muralidhar Mohol, Usha Dhore, .jpg

पिंपरी : कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या व्यापाऱ्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा देऊन त्यासाठी आक्रमक झालेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या भाजपच्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनी आता त्यासाठी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच साकडे घातले आहे. त्यानंतर शहराचे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनीही दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांच्याकडे शुक्रवारी (ता.६) केली. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कालच पत्र लिहित निर्बंध शिथिल करण्याची विनंती केली आहे. एकूणच दुकानांची वेळ वाढवून देण्यासाठी शासन, प्रशासनावरील दबाव वाढत चालला आहे. ही मागणी मान्य झाली नाही. तर नियमभंगाच्या तयारीपर्यंत दुकानदार आता पोचले आहेत. (BJP demands extension of shop hours) 

शहरातील कोरोना पॉझीटीव्हीटी रेट हा पाच टक्क्यांखाली येऊनही निर्बंध शिथिल न केल्याने ते करण्याची मागणी दोन्ही महापौरांनी केली आहे. राज्य सरकारने नुकतेच मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिकसारख्या मोठया शहरांना कोरोना निर्बंधातून दिलासा देत तेथील दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, पिंपरी आणि पुण्याचा मात्र, त्यासाठी अपवाद केल्याने हे दोन्ही महापौर नाराज झालेले आहेत. दोन्ही शहरातील कोरोना पॉझीटीव्हीटी रेट हा साडेतीन टक्यांवर येऊनही ही सवलत न दिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

नागरिकांची होत असलेली गैरसोय आणि व्यापारी वर्गातील असंतोष ध्यानात घेऊन ही सवलत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुकानदारांची जोरात बाजू मांडणारे पत्र या दोन्ही महापौरांनी राज्य सरकारला पाठवले आहे. दरम्यान, लांडगे यांनीही व्यापाऱ्यांची मागणी व त्यासाठीच्या त्यांनी उपसलेल्या आंदोलनाच्या हत्याराला पाठिंबा देत दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत वाढवून देण्याची आणि विकेन्ड लॉकडाऊनही कमी करण्याची मागणी केली आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमालीचा कमी होऊनही दुकाने उघडण्याची वेळ मर्यादा वाढवून देण्यात आलेली नाही, यावर त्यांनी बोट ठेवले आहे. लोकहिताच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत, असा आरोपही त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. 

सध्या सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरातील दुकानदारांना असलेली मुदत रात्री नऊपर्यंत वाढवून देण्यास हरकत नसल्याचे सांगत तशी मागणी ढोरे यांनी बुधवारी (ता.४) आयुक्तांकडे केली होती. चार वाजता दुकाने बंद, मात्र भाजीविक्री सुरु राहत असल्याने संतप्त झालेल्या महापौरांनी भाजीविक्रेते आयुक्तांचे नातेवाईक आहेत, का अशी विचारणाही त्यावेळी केली होती. आयुक्तांनी महापौरांची मागणी लागलीच मान्य न केल्याने शुक्रवारी (ता.६) त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच त्यासंदर्भात पत्र पाठवले. कोरोना निर्बंधामुळे काही व्यावसायिक अगदी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले आहेत, अशी भीती त्यांनी त्यात व्यक्त केली आहे. तसेच त्यामुळे शहरातील आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम झाल्याने महापालिकेची कर वसूली, बांधकाम परवाने, इतर कर व परवाने फी वसूली यावर देखील रोडावल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. परिणामी पालिकेवर कामाचा अतिरिक्त आर्थिक ताण वाढला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in