मोठा दिलासा : पुण्याला दोन दिवसांत ६ हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध; उद्या आणखी आठ हजार मिळणार
Big relief : 6,000 remdesiviris available to Pune in two days; tomorrow will get another eight thousand

मोठा दिलासा : पुण्याला दोन दिवसांत ६ हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध; उद्या आणखी आठ हजार मिळणार

त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट आणि वितरक यांच्याकडील रेमडेसिव्हिरची उपलब्धता आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून तुटवडा असलेली रेमडेसिव्हिर इंजेक्शनची 6 हजार 101 व्हायल्स पुणे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. ही इंजेक्शन रविवारी (ता. २५ एप्रिल) आणि सोमवारी (ता. २६ एप्रिल) मिळाली असून उद्या (मंगळवारी, ता. २७ एप्रिल) आणखी सुमारे आठ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होतील, त्याचा उपयोग पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आली.

ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ही इंजेक्शन वाटप करण्यात आली आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांचा समावेश आहे. संबंधित कोविड रुग्णालयांनी औषध साठा प्राप्त करून घेण्यासाठी रुग्णालयांच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात 11 एप्रिलपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरी भागात सहा भरारी पथके, तर  ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट आणि वितरक यांच्याकडील रेमडेसिव्हिरची उपलब्धता आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.  या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in/corona-virus-updates या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

खासगी कोविड रुग्णालयांत वाढ

पुणे जिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, सुमारे साडेपंधरा हजार ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. या बेड्सच्या क्षमतेच्या तुलनेत रुग्णालयांना रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.
 

पुणे जिल्ह्यात 590 खासगी रुग्णालयांना 26 एप्रिलअखेर 53 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत रेमडेसिव्हिरचा रुग्णालयांना योग्य प्रमाणात पुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in