अध्यक्षपदासाठी डावलेले बिडकर भाजप पुण्याचे प्रभारी; गोगावलेंकडे जिल्ह्याची जबाबदारी

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी इच्छुक असलेल्या गणेश बिडकर यांना पुण्याचे प्रभारी करून पक्षाने त्यांचे समाधान करण्यात प्रयत्न केला आहे.महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षे अवकाश आहे. या काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याबरोबर पुण्यात सरचिटणीस राजेश पांडे व त्यांच्या जोडीला बिडकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अध्यक्षपदासाठी डावलेले बिडकर भाजप पुण्याचे प्रभारी; गोगावलेंकडे जिल्ह्याची जबाबदारी
Bidkar BJP in-charge of Pune; Gogavale has the responsibility of the district

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी इच्छुक असलेल्या गणेश बिडकर यांना पुण्याचे प्रभारी करून पक्षाने त्यांचे समाधान करण्यात प्रयत्न केला आहे. पुण्यात पक्षाची सत्ता आहे. महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षे अवकाश आहे. या काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याबरोबर पुण्यात सरचिटणीस राजेश पांडे व त्यांच्या जोडीला बिडकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

गेल्या निवडणुकीत भाजपला पुण्यात प्रचंड यश मिळाले. तब्बल 98 नगरसेवक निवडून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचा मोठा फायदा त्यावेळी पक्षाला झाला. परिणामी पुण्यात भाजपची सत्ता आहे. या तीन वर्षांच्या सत्तेच्या काळात पक्षाचे ठोस स्वरूपाचे असे काम दिसले नाही. मात्र, कोरोना संकटाच्या निमित्ताने पक्षाचे काम लोकांना दिसू लागले आहे. पक्षासाठी पुढची दोन वर्षे महत्वाची आहेत. 

राज्यात सत्ताबदल झाला असल्याने पुढच्या दोन वर्षांत उल्लेखनीय काम करून महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत. पक्षाचे संघटन यासाठी सर्वात महत्वाचे असल्याने मुळीक, पांडे आणि बिडकर या तीन तरुण नेतृत्वाच्या हाती पक्षाची संघटना सोपविण्यात आल्याचे दिसते. 

बापट-पाटील यांची मर्जी सांभाळावी लागणार 

गिरीश बापट खासदार असले तरी पुण्याची जबाबदारी एका अर्थाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. पाटील कोथरूडचे आमदार असल्याने पुण्यात त्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पुण्यातल्या नव्या नियुक्‍त्यांमध्ये पाटील यांचा वरचष्मा दिसतोय. बिडकर यांच्याबरोबरच राजेश पांडे यांची आधीच नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे पाटील यांच्या विश्‍वासातले मानले जातात. त्यामुळे एका बाजूला खासदार बापट व दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांची मर्जी सांभाळत बिडकर व पांडे या दोघांशीही समन्वय ठेवून शहराध्यक्ष मुळीक यांना काम करावे लागणार आहे. 

शिस्तप्रिय गोगावलेंशी जिल्ह्यातील नेत्यांना जुळवून घ्यावे लागणार 

शहराबरोबर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून योगेश गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोगावले पुण्यातील जुने जाणते आहेत. पुण्याचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली जबाबदारी सांभाळली आहे. पुण्याच्या शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून पुणे ग्रामीणचे प्रभारी म्हणून नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिस्तप्रिय असलेल्या गोगावले यांच्याशी जिल्ह्यातील नेत्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे. 

जिल्ह्याला दिशा द्यावी लागणार 

माजी मंत्री राहिलेले बाळा भेगडे आणि माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना अनुक्रमे मावळ व शिरूरमधून पराभव स्वीकारावा लागला आहे. जिल्हाध्यक्ष म्हणूनही प्रदीर्घ काळ काम केलेल्या भेगडे यांच्या जागी गणेश भेगडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभेला जिल्ह्यात आलेले अपयश बाजूला सारून नव्याने संघटना बांधावी लागणार आहे. प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या गोगावले यांना जिल्ह्यातील या सर्व नेते व कार्यकर्त्यांशी समन्वय ठेवून नवी दिशा द्यावी लागणार आहे. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in