BharaneTried to Dudhganga in liquidate : Harshvardhan Patil | Sarkarnama

भरणेंनी दूधगंगा अवसायनात काढण्याचा प्रयत्न केला : हर्षवर्धन पाटील 

डॉ. संदेश शहा 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राज्याचे दूग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे इंदापूरचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, त्यांनी दूध दरवाढीसंदर्भात एक शब्दही काढला नाही, त्यावरून त्यांना शेतकऱ्यांविषयी किती कळवळा आहे, हे दिसून येते. या उलट इंदापूर येथील दूधगंगा दूध संघाने 'अमूल'शी करार केल्यानंतर हा संघ अवसायनात काढण्याचा प्रयत्न राज्य मंत्र्यांनी केला, असा आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. 

इंदापूर (जि. पुणे) : राज्याचे दूग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे इंदापूरचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, त्यांनी दूध दरवाढीसंदर्भात एक शब्दही काढला नाही, त्यावरून त्यांना शेतकऱ्यांविषयी किती कळवळा आहे, हे दिसून येते. या उलट इंदापूर येथील दूधगंगा दूध संघाने 'अमूल'शी करार केल्यानंतर हा संघ अवसायनात काढण्याचा प्रयत्न राज्य मंत्र्यांनी केला, असा आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. 

गाईच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये भाव द्यावा आणि प्रतिलिटर 10 रुपये, तर दुध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी दुधगंगा दूध संघ अवसायनात काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दुग्ध विकास राज्य मंत्री भरणे यांचा निषेध करण्यात आला. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले की आम्ही 40 वर्ष लालदिवा बघितला असून त्याचा वापर लोकहितासाठी केला असून करत राहणार आहोत. एमआयडीसी, शासकीय अधिकारी तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट घेऊन वाटून त्याचे फोटो काढून स्वतःची प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे स्वप्रसिद्धी करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचे काम राज्य मंत्र्यांनी केले आहे. राज्य मंत्री हे काठावर पास झाले असून ते मेरिटच्या गप्पा मारत आहेत. त्यांनी "आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून' ही नीती सोडली पाहिजे. आम्ही केले तर राजकारण आणि तुम्ही केले तर ती जनसेवा, ही वृत्ती सोडली पाहिजे, असा घाणाघात भरणे यांच्यावर केला. 

"राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोनाचा प्रश्‍न हाताळण्यात तसेच शेतकरी कर्जमाफी या संदर्भात अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यात आले. त्यांनी पुणे व जिल्ह्यासाठी काही दिले नाही. त्यामुळे हे सरकार आंधळं, बहिरे व बधीर आहे. इंदापूर येथील कोविड केंद्रात स्वच्छता, औषधे, व्हेंटिलेटर सुविधांचा अभाव आहे,'' असे आरोप पाटील यांनी राज्य सरकारवर केला. राज्यात रोज उत्पादीत होणारे 1 कोटी 35 लाख लिटर दूध सरकारला खरेदी करण्यास भाग पाडू, असेही त्यांनी म्हटले. 

या वेळी दूधगंगा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, माजी सभापती विलास वाघमोडे, ऍड. कृष्णाजी यादव, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हा संघटक शिवाजी मखरे, भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद, सोशल मीडिया प्रमुख हर्षवर्धन कांबळे यांची भाषणे झाली. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख