जलसमाधी घेतल्यावरच आमचे पुनर्वसन होणार का? 

शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा सरकारला जलवाहिनी महत्वाची वाटत असेल आणि ठरल्यानुसार सरकार जर एक किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम थांबविणार नसेल, तर आम्हीदेखील आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. सरकारच्या या भूमिकेविरोधात आम्ही आता पाण्यात उतरलो आहोत. काम बंद केले नाही तर गावागावांतील शेतकरी जलसमाधी घेतील,असा इशारा भामा आसखेड आंदोलकांनी रविवारी भामा आसखेड धरणाच्या पाण्यात उतरून दिला.
जलसमाधी घेतल्यावरच आमचे पुनर्वसन होणार का? 
Bhama Askhed project victims start agitation

आंबेठाण : "शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा सरकारला जलवाहिनी महत्वाची वाटत असेल आणि ठरल्यानुसार सरकार जर एक किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम थांबविणार नसेल, तर आम्हीदेखील आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. सरकारच्या या भूमिकेविरोधात आम्ही आता पाण्यात उतरलो आहोत. काम बंद केले नाही तर गावागावांतील शेतकरी जलसमाधी घेतील,' असा इशारा भामा आसखेड आंदोलकांनी रविवारी भामा आसखेड धरणाच्या पाण्यात उतरून दिला. एकप्रकारे शेतकऱ्यांनी कुटुंबासह धरणाच्या जलसाठ्यात उतरून रणशिंग फुंकले आहे. 

आमचे रखडलेले पुनर्वसन करा नाही, तर जलसमाधी घेऊ अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यापूर्वी देखील एका तरुण शेतकऱ्याने जलसमाधी घेतल्याने आणि आता पुन्हा शेतकऱ्यांनी तीच भूमिका घेतल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांनी तहसीलदारांना शनिवारी निवेदन देऊन काम बंद ठेवण्याची विनंती केली होती. जलवाहिनीचे काम न थांबविल्यास पाण्यात उतरून आंदोलन करून जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. तरीही काम सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. 

देवतोरणे, कुदळवाडी येथे 12 ते 15 शेतकऱ्यांनी घरातील वृद्ध, महिला, लहान मुले यांच्यासह पाण्यात उतरले होते. या वेळी महादू भैरू गुरव, बाजीराव भिका गाडे, संतू भिका गाडे, संतोष चिंधु गाडे, ज्ञानेश्वर दामू कुदळे हे तर पाईट येथील गवारवाडी येथे देखील जवळपास 15 तरुण आणि लहान मुले पाण्यात उतरली होती. 

आंदोलन प्रमुखांच्या आवाहनानंतर ते उशिरा पाण्याबाहेर आले. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु गवारवाडी येथील प्रकल्पग्रस्त तरुण त्यांच्या भूमिकेवर ठाम होते आणि काम बंद करण्याची मागणी करीत होते. 

किती बळी घेणार? 

न्याय मिळेना म्हणून रौधळवाडी येथील ज्ञानेश्वर गुंजाळ या शेतकऱ्याने जलसमाधी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी जमिनीचा सातबारा व मदतीचा धनादेश प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला होता. जर पुनर्वसन मार्गी लावायचे असेल तर असेच बळी द्यायचे का? असा सवाल उपस्थित करून जलसमाधी घेतल्यावर प्रशासन पुनर्वसन करणार का? अशी विचारणा शेतकरी करीत आहे. 

प्रकल्पग्रस्त शेतकरी अजित पवार यांना भेटले 

आंबेठाण : भामा आसखेड धरणाहून पुण्याला करण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम मी सुरू केले नाही, तर ते मागच्या सरकारने सुरू केले आहे. सध्या पोलिस बंदोबस्तात काम सुरू आहे, असे माझ्या कानावर आले आहे. याबाबत 12 तारखेला जिल्हाधिकारी बैठक घेतील. त्याअगोदर आमदार, खासदार यांची बैठक घेतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांना शुक्रवारी दिली. 

दरम्यान, आंदोलक प्रकल्पग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भामा आसखेड जलवाहिनीचा तिढा सुटण्याची कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. 

वहागाव (ता. खेड) येथे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करून भामा आसखेड ते पुणे जलवाहिनीचे काम बंद पाडले होते. पण प्रशासनाने ते पोलिस बंदोबस्तात सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे काम सुरू करण्यात आल्याचे त्या वेळी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले होते. त्या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का, असा सवाल विचारला होता. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी अजित पवार बोलत होते. 

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सरकारकडून अन्याय होत असल्याची तक्रारही त्यांनी या वेळी केली. 

या वेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in