पुणेकरांनी आवरा स्वतःला; अन्यथा लागू शकतो पुन्हा लाॅकडाऊन!

शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. लाॅकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर पुणेकर अक्षरशः सुटले आहेत. कारणाशिवाय बाहेर पडतानाच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही सर्रास उल्लंघन होताना दिसते आहे.
 पुणेकरांनी आवरा स्वतःला; अन्यथा लागू शकतो पुन्हा लाॅकडाऊन!
Beware Punekars Lock Down can be Increased

पुणे :  शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. लाॅकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर पुणेकर अक्षरशः सुटले आहेत. कारणाशिवाय बाहेर पडतानाच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही सर्रास उल्लंघन होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अधिकृत पातळीवर मात्र याबाबचा निर्णय केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरचा असेल असे सांगण्यात येत आहे. 

रोजची रुग्णसंख्या वाढती आहे. पुणे शहरात रविवारी कोरोनाचे तब्बल ६२० रुग्ण सापडले. एकूण रुग्णसंख्या बारा हजारांहून अधिक आहे. जिल्हा व पिंपरी चिंचवडमध्येही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. कडक उपाययोजनांखेरीज शहर व जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ शकणार नाही, असे आता बोलले जाऊ लागले आहे.

रुग्णसंख्या वाढीचा केंद्र सरकारचा इशारा

कोरोनाच्या रुग्णांची संख्या येत्या काळात वाढेल हे लक्षात घेऊन प्रशासनाने त्या दृष्टीने काळजी घ्यावी, असा आदेश केंद्र सरकारच्या पथकाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला यापूर्वीच दिला आहे. मुंबईतली परिस्थितीही गंभीर असल्याचे तेथील वाढत्या रुग्णसंख्येवरुन स्पष्ट होते आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील बाजारपेठांमध्ये भीती वाटावी, अशी गर्दी होताना दिसते आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना नागरिक दिसतात. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पुणे व पिंपरी चिंचवडसह सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावला जाईल, अशा आशयाचे मेसेज काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. याबाबत नक्की काय हे समजत नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम आहे. अनेकजण सोशल मिडियावरुन मजकून पुढे पाठवताना त्यात आणखी भर टाकत असल्याचेही दिसून आले आहे. पोलिसांच्या पातळीवर याबाबत चौकशी केली असता "लाॅकडाऊनचा निर्णय केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर घेतला जातो. हे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जात नाहीत. सध्या राज्य शासनाने एक जून रोजी दिलेल्या आदेशांनुसार कार्यवाही केली जात आहे. कन्टेन्मेंट झोन वाढवणे किंवा कमी करणे हे काम स्थानिक प्रशासन करते. त्याबाबत काम सुरु आहे," अशी माहिती पुण्याचे पोलिस सहआयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे यांनी दिली. 

"स्थानिक पातळीवर लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय झालेला नाही. सध्या  रुग्णांची संख्या वाढती असली तरी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशांनुसार काम सुरु आहे. सुधारित आदेश आले तर त्यानुसार अंमलबजावणी करु," असे महापालिका आयुक्त डाॅ. शेखर गायकवाड यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in