सभापतिपदाचे जांभूळ अशोक पवार कुणाच्या मुखी भरवणार? 

आगामी दोन वर्षांत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी तिघांना, तर उपसभापतिपदी चार जणांना संधी देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सभापतिपदाचे जांभूळ अशोक पवार कुणाच्या मुखी भरवणार? 
Ashok Pawar Who will give a chance to as the Chairman of Shirur Bazar Samiti?

शिक्रापूर (पुणे) : आगामी दोन वर्षांत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी तिघांना, तर उपसभापतिपदी चार जणांना संधी देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

दरम्यान, सभापतिपदाचे जांभूळ कोणत्या शंकराच्या तोंडात पडणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. याबाबतचा निर्णय आमदार अशोक पवार उद्याच (ता. 29 जून) जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 

शिरूर कृषी उप्तन्न बाजार समितीची तीन वर्षांपूर्वी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने 15 जागा जिंकत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. 

सभापतिपदी शशिकांत दसगुडे यांना, तर उपसभापती म्हणून विश्वास ढमढेरे यांना संधी देण्यात आली. गेल्या तीन वर्षांत दोन्ही ठिकाणी खांदेपालट व्हावी, अशी अनेक संचालकांची इच्छा होती. मात्र, तसे घडले नाही. दोन्ही ठिकाणी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातीलच संचालक असल्याने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील संचालक खांदेपालटसाठी आग्रही होते. अखेर त्याचा मुहूर्त ठरला आणि सभापती दसगुडे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्या जागी उद्या (ता. 29 जून) नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे. 

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील एका संचालकाने बंडाची तयारी करून काही संचालकांशी संगनमतही बांधले होते. त्याला भाजपच्या तीन संचालकांची फूस होती. याबाबतचे वृत्त परवा 26 जून रोजी "सरकारनामा'मध्ये प्रसिद्ध होताच संध्याकाळी सहाच्या सुमारास आमदार अशोक पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात सर्व संचालकांची एक विशेष बैठक घेतली. 

यात माजी सभापती प्रकाश पवार, माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर या दोघांशिवाय पक्षाचे इतर सर्व संचालक उपस्थित होते. यात सर्वांची एकत्रित बैठक झाली. त्यानंतर सभापतिपदासाठी इच्छुक आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर, काकासाहेब कोरेकर यांच्यासोबत पवार यांनी बंद खोलीत प्रत्येकी पाच-पाच मिनिटे चर्चाही केली. त्यानंतर त्यांना ठरलेला निर्णय सांगण्यात आला. त्यातील दोन संचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर वरील माहिती दिली आहे. 

शिरूर बाजार समितीचा कारभार गेल्या दोन वर्षात उत्तम केला. या पुढेही उत्तम व्हावा; म्हणून संचालकांमध्ये मतभेद नकोत. यासाठी पुढील दोन वर्षांत तीन सभापती आणि चार उपसभापती करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात पहिला नंबर कुणाचा लागणार, हे पवार यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील संचालकांची एक स्वतंत्र बैठक माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता.27 जून) झाली. त्यातही वरील तीन-चार (सभापती-उपसभापती) फॉर्म्युल्यास होकार मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या मुळे बंडोबांचे बंड केवळ चर्चेपुरतेच मर्यादित राहण्याची शक्‍यता आहे. 

सन 2011 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी... 

सभापती निवडीत 2011 ची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आमदार अशोक पवारांना होता. म्हणूनच या वेळी सभापती-उपसभापतींचे राजीनामे घेत असल्याचे सांगून केवळ सभापतींचा राजीनामा आणि एकाच पदाची निवडणूक होईल, अशी राजकीय रणनीती पवारांनी आखली. पर्यायाने सभापती नाही तर उपसभापतिपदी तरी वर्णी लागेल, या आशाने अनेक इच्छुकांनी आपापल्या तलवारी या प्रक्रियेत म्यान केल्या. त्यामुळे तीन सभापती आणि चार उपसभापतींच्या मेळ्यात आता अनेकांची स्वप्ने पूर्ण होण्याचा मार्ग काढल्याने "बंडोबा' एकत्र येण्याची प्रक्रियाच हद्दपार झाली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in