Ashok Pawar avoided the bitter incidents in Shirur Bazar Samiti | Sarkarnama

शिरूर बाजार समितीतील 'मंगल'मय घडामोडी अशोक पवारांनी टाळल्या 

नितीन बारवकर 
सोमवार, 29 जून 2020

मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक फोडून या पूर्वी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद पटकाविले होते. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वेळीच डावपेच आखून त्या कटू घडामोडींची पुनरावृत्ती टाळली.

शिरूर (पुणे) : मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक फोडून या पूर्वी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद पटकाविले होते. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वेळीच डावपेच आखून त्या कटू घडामोडींची पुनरावृत्ती टाळली.

बाजार समितीच्या सभापतिपदावर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचा झेंडा फडकला असला; तरी आमदार पवार यांच्या मुत्सद्देगिरीवरही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या निवडीत ज्येष्ठत्वाचा मान कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मिळाला असला; तरी पवारांच्या भात्यातून सुटलेल्या जहरी बाणांमुळे "त्या' विभागातले भलेभले गारद होऊन "विभागीय अस्मिता' चांगलीच घायाळ झाल्याचे चित्र आहे. 

शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडीवरून यापूर्वी झालेल्या रंजक घडामोडी पाहता, आमदार पवार यांनी सुरुवातीपासूनच अतिशय सावध पवित्रा घेतला होता. आबाराजे मांढरे या आपल्या कट्टर समर्थक संचालकाला सभापती पदावर बसवण्याचे पक्के नियोजन त्यांनी केले असताना आंबेगाव मतदारसंघातील काही महत्वाकांक्षी संचालकांनी बंडाळी माजवत गुप्त हालचाली सुरू केल्या. विरोधी भारतीय जनता पक्षाच्या तीन संचालकांशीही संधान साधले. या हालचालींचा सुगावा लागताच आमदार पवार यांनी सर्वांची मते जाणून घेण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समोर प्रत्येकाला उघडे केले. 

गतवेळी शिरूर भागात सभापती पद होते. या वेळी आमच्या भागाला मिळावे, अशी आग्रही मागणी आंबेगाव मतदार संघाला जोडलेल्या 39 गावातील संचालकांनी केली. याला आमदार पवार विरोध करतील, आपल्या भागात पद नेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील, असा या मंडळींचा होरा होता.

तीच संधी साधून सर्व असंतुष्टांना, यापूर्वी शब्द देऊनही संधी न दिलेल्या नाराजांना आणि विरोधकांना हाताशी धरुन हवी तशी खिचडी शिजवण्याचा घाट घालण्यात आला होता. "आमच्या भागावर कायमच अन्याय होत आलाय' या पालुपदामुळे त्याला वरिष्ठ पातळीवरुनही हवी तशी ताकद आणि फूस मिळण्याची शक्‍यता होती. 

नेमके हेच डावपेच हेरून आमदार पवार यांनी सर्वांची मते जाणून घेताना "आमच्या पाचपैकी कुणालाही सभापती करा' असे त्यांच्याच तोंडून वदवून घेतले आणि "हारे तो भी बाजी मारे' या युक्तीप्रमाणे बंडाळीचा डाव लिलया उलटवला. 

आमदार पवार यांच्या या खेळीने गारद झालेल्या संचालकांना आज अखेरच्या क्षणी काहीच हालचाली करता आल्या नाहीत. शिरूर भागाला सभापतिपद द्यायचे नाही, या ठाम पावित्र्यामुळे शिरूरच्या संचालकांची खप्पामर्जी ओढवून घेताना "आपलेच दात आणि आपलेच ओठ' या उक्तीप्रमाणे तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मारही सहन करावा लागला.

सभापती पदाबाबत आपली मते मांडताना आणि आमच्यापैकी कुणालाही सभापती करा, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या या महत्वाकांक्षी संचालकांवर "हात दाखवून अवलक्षण' अशी वेळ आली. 

आमदार पवार यांच्या मुत्सद्देगिरीने आणि वेळप्रसंगी आपल्या माणसांना नाराज करून खेळल्या गेलेल्या या अनोख्या खेळीने "मान' मिळविण्यासाठी "शिंग' रोखलेल्या आणि सभापतिपदाचा "प्रकाश' पुन्हा पाडण्यासाठी सरसावलेल्यांची तोंडे कडू पडली. नेतृत्वाच्या अनोख्या कौशल्याचा आविष्कार घडवित आजच्या सोमवार म्हणजे शंकराच्या वाराच्या दिवशी सभापतिपदाचे गोड जांभूळ त्यांनी शंकर जांभळकर यांच्या मुखी भरविले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख