तोडफोड फेम वसंत मोरे सांभाळणार पुणे मनसेची धुरा - Appointment of Vasant More as Pune City President of Maharashtra Navnirman Sena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

तोडफोड फेम वसंत मोरे सांभाळणार पुणे मनसेची धुरा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 मार्च 2021

गेली पंधरा वर्षे ते मनसेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षपदी नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली पाच वर्षे शहराध्यक्ष राहिलेले अजय शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. 

मोरे व शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या वतीने आज (ता. 3 मार्च) करण्यात आली. नगरसेवक मोरे सध्या प्रदेश सरचिटणीस होते. गेली पंधरा वर्षे ते मनसेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मोरे यांच्याकडे सध्या पुणे महापालिकेतील पक्षाचे गटनेतेपद आहे. मोरे यांच्यासारख्या धडाडीच्या नेतृत्वाकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देऊन पक्षाने आगामी पालिका निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. 

पुणे महापालिकेत कात्रज भागाचे प्रतिनिधित्व करणारे मोरे हे विविध समाजोपयोगी आणि पक्षीय आंदोलनात कायम पुढे असतात. मनसेच्या तिकीटावर सलग तीनवेळा नगरसेवक झालेले मोरे हे महाराष्ट्रातील एकमेव नगरसेवक आहेत. ते 2007, 2012 व 2017 या तीनही निवडणुकांत सलगपणे महापालिकेवर निवडून आले आहेत. 

मोरे यांनी 15 वर्षे नगरसेवक, दोन वर्षे स्थायी समितीचे सदस्य, विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले आहे. माझ्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून पुणे महापालिकेवर मनसेचा झेंडा फडविण्याचे राज ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पक्षाचे 2012 च्या निवडणुकीत पुण्यात 29 नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणुकीत किमान 29 चा आकडा गाठणे आपले ध्येय असल्याचे मोरे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

राज ठाकरे यांना मानणारा मोठा तरुणवर्ग शहरात आहे. मात्र, पक्षाचे संघटन हे मोठे आव्हान असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समर्थ संघटन उभे करून तरुणांना संधी देण्याचे आव्हान मोरे यांच्यासमोर आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर ठाकरे यांना पुण्यातून सर्वाधिक समर्थन मिळाले होते. पहिल्याच निवडणुकीत 2012 मध्ये महापालिकेत तब्बल 29 नगरसेवक निवडून आले होते. गेल्या काही वर्षांत मात्र पक्षाची संघटनेच्या पातळीवर फारशी चांगली स्थिती नाही. त्यामुळे मोरे यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असून या काळात संघटन बांधणीबरोबरच पक्षाची निवडणुकीचीही तयारी करावी लागणार आहे. 

पुणे शहरात शिवसेनेइतकीच मनसेची ताकद आहे. मात्र, संघटनात्मक पातळीवर मनसे तितकीशी ताकदवान नाही. शिवसेना राज्यातील सत्तेच्या जोरावर महापालिका निवडणुकीची तयारी जोरदारपणे करत आहेत. त्या तुलनेत मोरे यांना शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख