भाजपच्या दादा, भाऊंच्या नातेवाईकांचीच 'शिकार' का? 

भाजपने अद्याप स्थायी सभापतींवर कारवाई केलेली नाही.
भाजपच्या दादा, भाऊंच्या नातेवाईकांचीच 'शिकार' का? 
Mahesh Landage, Laxman Jagtap .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे कारभारी भाजपचे भोसरीचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे  (Mahesh Landage) यांचे चुलत चुलत बंधू आणि पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना १८ तारखेला लाच प्रकरणात अटक झाली. तर, डबल मोका लागलेले शहराचे दुसरे कारभारी चिंचवडचे भाजप आमदार आणि माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे मावसभाऊ नानासाहेब गायकवाड यांचीही लगेचच दुसऱ्या दिवशी धरपकड झाली. कायद्यानुसार ही कारवाई झाली असली, तरी काही तासांच्या फरकाने या दोन्ही अटक झाल्याने सहा महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीची ही खेळी, तर नाही, ना अशी चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळेच लाचखोरीचे षडयंत्र असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. परिणामी त्यांनी अद्याप स्थायी सभापतींवर कारवाई केलेली नाही. (Amol Thorat criticizes Mahavikas Aghadi government) 

कारभाऱ्यांच्याच जवळच्या गोटाला तथा भावकीला लक्ष्य करून त्यातून घरवापसीचा न सांगता सूचक संदेश तर देण्यात आला नाही ना, असेही ऐकायला मिळाले आहे. फेब्रुवारी २०२२ ची पिंपरी महापालिकेची निवडणूक (ओबीसी आरक्षण मुद्यावरून पुढे गेली नाही, तर) सद्यस्थितीत अनेक सुभेदार व भाजपला पुरुन उरणाऱ्या नेतृत्वाअभावी सध्याच्या बळावर राष्ट्रवादी पालिकेत पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता कमी असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांनाही वाटते आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार ही किमया करू शकतात. मात्र, त्यांच्या खांद्यावर पिंपरीच नाही, तर अख्या राज्याचा भार, जबाबदारी आहे. म्हणून २०१७ ला पक्ष सोडून गेलेले परत आले. तर पुन्हा सत्तेत येणे राष्ट्रवादीला सोपे जाणार आहे. म्हणून त्यांना तसा कडक व नेमका संदेश देण्यासाठी ही कारवाई झाली की काय अशी कूजबूज सध्या ऐकायला येते आहे. त्यातून घरवापसीचे आवतण दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. नेमकी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गपगार करणारी ही मोठी कारवाई झाल्याने या चर्चेने मूळ धरले असून भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रतिवादातूनही त्याला बळही मिळाले आहे. 

आजही शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दबावतंत्र वापरून आमदार जगताप व आमदार लांडगे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला. मात्र, कोणत्याही दबावाला आम्ही भीक घालत नाही. दोन्ही आमदारांची ताकद व कार्यकर्त्यांच्या बळावर पिंपरी पालिकेत पक्षाचीच पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गतवेळी ७७ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी शंभरप्लसचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in