देवाच्या आळंदीत भरतेय जुगाऱ्यांची जत्रा 

आळंदी (ता. खेड) येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता.4) रात्री छापा टाकला. मात्र, तो जुगाराचा अड्डा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने तोडपाणी झाली की काय, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
देवाच्या आळंदीत भरतेय जुगाऱ्यांची जत्रा 
Alandi police raid gambling den

आळंदी  : आळंदी (ता. खेड) येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता.4) रात्री छापा टाकला. मात्र, तो जुगाराचा अड्डा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने तोडपाणी झाली की काय, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उभारले जात आहे. 

मंदिर परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर गुरुवारी (ता. 4) चार पोलिसांनी टाकलेल्या छाप्याच्या चर्चेने आळंदी पोलिसांचा कारभार उजेडात आला. भरलोकवस्तीत आणि तेही मंदिर परिसरात सध्या दोन जुगाराचे अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे. शहरातील प्रतिष्ठीत लोक या ठिकाणी तासनतास जुगार खेळत असत. खेळाडूंना मद्य, चहा कॉफी, नाष्टा जागेवर दिला जाई. त्यामुळे गर्दी वाढत होती. 

जुगार अड्डयांना बरकत 

कोरोनाच्या काळात संचारबंदी असतानाही आळंदीतील जुगार अड्ड्यांवर चांगली बरकत होती. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी रात्रीच्या वेळी पोलिसांनी छापा टाकला आणि जुगाऱ्यांची एकच पळापळ झाली. छापा टाकला खरा मात्र हा जुगार अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. महिना हप्ता देण्याबाबत तोडपाणी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मुळात माउली मंदिरासारख्या महत्वाच्या परिसरात जुगार अड्डा रोजरोस चालतो, हेच आळंदीकरांसाठी लांच्छनास्पद आहे. मात्र यामध्ये चिरमिरी नाही, तर भरघोस मलिदा मिळत असल्याने पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

पहाटे गांजाविक्री 

वडगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात काही राजकिय मंडळी राजरोस जुगार खेळत असल्याची चर्चा आहे. एकंदर यापूर्वी दारू, मटका, गांजा, अवैध लॉजिंग असे प्रकार होत होते. आता त्यात जुगाराची भर पडली आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून तर या अवैध धंद्यांना ऊत आला आहे. आळंदीत पहाटेच्या वेळी गांजा विक्री होत असल्याची कुजबूज नागरिकांमध्ये सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात गांजा आणि दारूची विक्री होत आहे. 

हॉटेल, ढाबे मोठ्या संख्येने 

आळंदीच नव्हे तर आळंदी परिसरातील चऱ्होली, हनुमानवाडी, केळगाव, मरकळ, गोलेगाव, कोयाळी या गावातही अवैधरित्या दारू विकली जाते. औद्योगिक भाग असल्याने हॉटेल आणि ढाबा व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत. मद्याशिवाय हे धंदे चालत नसल्याने येथेही पोलिसांच्या आशीर्वादाचीच चर्चा आहे. 
 

दुकाने उघडण्याबाबतच्या निर्णयाची चर्चा 

आळंदी शहरातील व्यावसायिक दुकाने शुक्रवारपासून दिवसाआड सम विषम तारखेला सुरू ठेवली जाणार होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांतच नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने आपला आदेश फिरवला. सम विषम तारखेला दुकाने उघडण्याचा आराखडा बंद करून आता दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने उघडण्याचा आदेश लागू केला. नगरपालिका आणि पोलिसांच्या या निर्णयामुळे आळंदीकर नागरिकांचा गोंधळ उडत आहे. 

आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी या पूर्वी समविषम तारखेला दुकाने चालू ठेवण्याचा आदेश काढला होता. मात्र शुक्रवारचा दिवस उजाडण्यापूर्वीच नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने पुन्हा समविषम तारखेला दुकाने चालू ठेवण्याऐवजी आता केवळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच दुकाने चालू ठेवण्यास सांगितले. खरे तर सम विषम तारखेला दुकाने चालू ठेवण्याच्या आदेशाचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र, अचानक बदल केल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. दुकाने उघडी ठेवण्याबाबत प्रशासनाने अचनाक भूमिका का बदलली याची चर्चा आता आळंदीत सुरू आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in