Ajitdada, when will action be taken against the hospitals that rob patients in Pune? | Sarkarnama

अजितदादा, पुण्यातील लुटारू रुग्णालयांवर कारवाई कधी होणार? 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 1 जुलै 2020

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून रोज पाचशेच्या पुढे जात आहे. रुग्ण वाढत असल्याने महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. खासगी रुग्णालयावरदेखील जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण उरले नाही.

पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून रोज पाचशेच्या पुढे जात आहे. रुग्ण वाढत असल्याने महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. खासगी रुग्णालयावरदेखील जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण उरले नाही. अनेक छोट्या-मोठ्या रुग्णालयात जनरल वॉर्डसाठी दिवसाला पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे नावाजलेली रुग्णालये यात आघाडीवर आहेत. 

रोज पेशंट वाढत असल्याने महापालिका रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत. मात्र, रुग्णालयात प्रत्येक बेडसाठी रोज पाच हजार रुपये आकारण्यात येत आहे. ज्या रुग्णांना त्रास होत नाही. त्यांना उचाराची गरज पडत नाही. मात्र, कोरोनाचा त्रास होऊ लागला तर उपचाराचा खर्च वेगळा घेण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तरी अनेक रुग्णांना रूग्णालये उपलब्ध होत नसल्याने घरीच राहण्याची वेळ आली आहे. 

रुग्ण तरुण असतील तर फारशी अडचण येत नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना तातडीच्या उपचाराची गरज असताना वेळेत रुग्णालय मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्ण वाढतील हे गृहीत धरून शहरातील सर्व रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, खाटा शिल्लक नाहीत, असे सांगून महापालिका प्रशासन रुग्णांना वाऱ्यावर सोडून देण्यात येत आहे. 

रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांकडून लूट होत असल्याची माहिती त्यांच्या कानावर जात नाही का? असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. रुग्णालयांकडून सुरू असलेली लूट महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या लक्षात का येत नाही? असे सामान्य जनतेकडून विचारण्यात येत आहे. 

पुण्यातील सर्व रुग्णालयातील खाटा प्रशासनाने खरोखरच ताब्यात घेतल्या असतील, तर रुग्णांना परत का पाठविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाला कोणत्या रूग्णालयाकडून किती शुल्क घेण्यात येते, याची पुरेशी कल्पना आहे. मात्र, कारवाई कुणीच करत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

एका बाजूला रुग्णालयांची ही स्थिती तर दुसरीकडे क्वॉरंटाइन सेंटरची अवस्था आणखी बिकट आहे. पुण्यात अनेक ठिकाणी अशी सेंटर उघडण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी स्वच्छतेच्या सारख्या प्राथमिक सुविधांकडेदेखील लक्ष दिले जात नाही. संडास, बाथरूम तसेच इमारतीचा परिसर अनेक ठिकाणी अस्वच्छ आहे. चादर, बेडशिट यांसारख्या सुविधादेखील योग्य पद्धतीने दिल्या जात नाहीत. अनेकांना या साऱ्या गोष्टी आपल्या घरून मागवाव्या लागत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख