सद्यस्थिती राजकारणाची नव्हे; जनहितास प्राधान्य देण्याची : अजित पवार 

पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे; तर संपूर्ण राज्य कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामूहीक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्‍चित हरवू.
सद्यस्थिती राजकारणाची नव्हे; जनहितास प्राधान्य देण्याची : अजित पवार 
Ajit Pawar's visit to Corona War Room in Pimpri

पुणे : "पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे; तर संपूर्ण राज्य कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामूहीक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्‍चित हरवू,'' असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 29) व्यक्त केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यांनी वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. 

या वेळी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएमचे अधिकारी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले की, कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या लढ्यात सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास कोरोनावर निश्‍चितच विजय मिळवू. 

राज्यातील उद्योग सुरू करायला परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्‍चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलिस, डॉक्‍टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. 

पुण्यातून पिंपरीत येण्याबाबत तोडगा काढू 

पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमधून पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र, पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे प्रश्‍न आहेत, त्यावरही तत्काळ मार्ग काढला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

पिंपरीतील हॉटेलचालकांची मुंबईत बैठक 

पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून या वेळी हॉटेलसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in