अजित पवार म्हणतात, 'नाय तर हस्तक्षेप करावा लागेल...' 

पुणे शहरातील 323 रस्त्यांवरच का, असा प्रश्‍न करून 'शहरातील सर्वच सहा आणि साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरून बांधकाम करण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या.
अजित पवार म्हणतात, 'नाय तर हस्तक्षेप करावा लागेल...' 
Ajit Pawar's suggestion to solve the TDR issue in Pune by sitting together

पुणे : पुणे शहरातील 323 रस्त्यांवरच का, असा प्रश्‍न करून 'शहरातील सर्वच सहा आणि साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरून बांधकाम करण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 6) महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या. एकत्र बसून निर्णय घ्या; अन्यथा राज्य सरकारला यात हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला दिला. 

पुणे शहरातील सहा आणि साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे कलम 210 अन्वये रुंदीकरण दर्शवून, त्या ठिकाणी टीडीआर वापरून, बांधकाम परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे. या प्रस्तावावरून महापालिकेतील सत्ताधारी विरोधात महाआघाडी असा वाद सुरू झाला आहे.

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार शनिवारी पुण्यात आले होते. त्यावेळी आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पवार यांची भेट घेतली. 

ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून, हा विषय स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. बहुमताच्या जोरावर तो मान्य करण्याची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची शक्‍यता आहे. ठराविक रस्त्यांऐवजी संपूर्ण शहरात त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगसेवक आबा बागूल यांनीही राज्य सरकारला पत्र दिले होते. 

त्यावेळी अजित पवार यांनी वरील सूचना दिल्या. ठराविक रस्त्यांवर परवानगी देण्याऐवजी शहरातील सर्वच रस्त्यांवर त्यांची अंमलबजावणी करावी. त्यासाठी महापालिकेतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. कोणच्या फायद्यासाठी हा निर्णय न घेता शहराच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घ्यावा. तरी देखील महापालिकेने हा निर्णय घेतला, तर मात्र सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करेल, असा इशाराही या वेळी अजित पवार यांनी दिला. 

पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. या प्रस्तावात पालकमंत्री अजित पवार यांनीच हस्तक्षेप केल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आता काय निर्णय घेणार, या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in