अजितदादाच पुन्हा पुण्याचे कारभारी... या निर्णयामुळे झाले शिक्कामोर्तब

कोरोना साथीतील निर्णय़ असो की शहरविकासाच्या घडामोडी यावर आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचे मत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे भाजपने पालिकेत बहुमताच्या जोरावर मान्य केलेला ठराव राज्य सरकारचे अधिकार वापरून अजित पवारांनी रद्द केला.
अजितदादाच पुन्हा पुण्याचे कारभारी... या निर्णयामुळे झाले शिक्कामोर्तब
ajit pawar

पुणे : पुणे शहरातील सत्ताधारी भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्का दिला आहे. पालिकेने मंजूर केलेला टीडीआरविषयीचा ठराव  रद्द करत आपणच पुण्याचे कारभारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा भाजपला झटका मानला जात आहे. माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी पण या ठरावासाठी जोर लावला होता. मात्र या दोन दादांच्या वादात सध्या तरी अजित पवारांनी कुरघोडी केली आहे. 

पुणे महापालिकेत भाजपने बहुमताच्या जोरावर 6 ते 9 मीटर रुंद असलेल्या 323 रस्त्यांवर टिडीआर वापरण्याचा ठराव आठ  दिवसांपूर्वी मंजूर केला होता.  तो चर्चेला येण्याआधीच अजितदादांनी त्याविषयी आक्षेप घेतला होता. त्यांनी संपूर्ण शहरातील रस्त्यांसाठी लागू करणार ठराव करण्याच्या सूचना दिली होती आणि तसे न केल्यास तो रद्द करण्याचाही इशारा दिला होता. तो इशारा त्यांनी खरा ठरवला. सगळ्यांनी एकत्र सगळ्याच रस्त्यांवर टिडीआर वापरण्याची परवानगी द्या, अशी सूचना त्यांनी केली होती. परंतु, भाजपने ती सूचना धुडकावून लावल्यावर पवार यांनी आजच्या बैठकीत हिशेब चुकता केला.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नगरविकात खात्यातील सचिव डॉ. नितीन करीर, महेश पाठक तसेच खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ तसेच अन्य गटनेते उपस्थित होते. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरून बैठकीत भाग घेतला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे यांनी विरोध केल्यावर सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर टिडीआर वापरण्यास परवानगी देण्याची उपसूचना महापालिकेत त्यावेळी मंजूर करण्यात आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नसल्याने आज बैठक झाली.  त्यात 6 मीटर आणि त्यापेक्षा रुंद असलेल्या रस्त्यांवर टिडीआर वापरण्यास परवानगी दिली. तसेच फ्रंट मार्जिनमध्ये शिथिलता दिली आणि महापालिकेच्या स्थायी समितीच्या ठरावाला स्थगिती देण्याचा आदेश दिला. संबंधित भूखंड मालकाला त्याचा बांधकाम आराखडा मंजूर करताना दीड मीटर जागा सोडण्याचे बंधन असेल. त्यानंतरचा त्याचा आराखडा मंजूर होईल. आता टिडीआर वापरण्यासाठी मार्केट खुले झाल्यामुळे बांधकाम क्षेत्राला काही प्रमाणात चालना मिळण्याची चिन्हे आहेत. शहरात पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूड- वारजे परिसर तसेच एरंडवणे, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, आदी भागात आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in