अजित पवार कार्यक्षम आणि शरद पवारांचा एक फोन परिस्थिती बदलवू शकतो....
ajit pawar chandrakantdada-sharad pawar

अजित पवार कार्यक्षम आणि शरद पवारांचा एक फोन परिस्थिती बदलवू शकतो....

चंद्रकांतदादांचे सौम्य प्रत्युत्तर

पुणे : ऐन कोरोनाकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय सामना रंगला आहे. अजित पवार पुणेकरांना उपलब्ध नसल्याची टीका चंद्रकांतदादांनी केल्यानंतर त्याला तितकेच तिखट प्रत्युत्तर अजितदादांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिले. त्यावर चंद्रकांतदादांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता थोडी सौम्यपणेच त्यावर ते बोलले. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी एक फोन केला तर राज्यातील कोरोना संकटाची परिस्थिती बदलेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच अजित पवार यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले.

चंद्रकांतदादा म्हणाले की काही मंत्र्यांचा दिवस सकाळी ११ शिवाय उगवत नाही. पण अजिदादा सात वाजता मंत्रालयात असतात हे खरे आहे. मात्र, त्यांच्यावर कामाचा ताण येत असेल तर त्यांनी पुण्यातून राज्य चालवावे किंवा पुण्याला दुसरा पालकमंत्री देऊन मुंबईतून राज्याचा कारभार पाहावा, अशी सूचना त्यांनी केली.

नगरसेविका मंजुषा खर्डेकर यांच्या प्रयत्नातून एसएनडीटी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार उपलब्ध नाहीत असे मी म्हणालो होते. पण त्या दिवशी ते खरोखरंच २४ तास उपलब्ध नव्हते. त्यांच्यावर टीका करण्याचा हेतू नव्हता. अजित पवार यांच्या कार्यक्षमतेबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वच प्रकारच्या कार्यक्षमतेबद्दल मी बोलतोय. मात्र ते आता केवळ व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांना उपलब्ध होत आहेत. त्यांनी तसे न करता आता लोकांना भेटले पाहिजे. लोकांना दिलाशाची गरज आहे.'

शरद पवारांचा एक फोन चित्र पालटू शकतो

आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा शरद पवार यांना उत्तम अनुभव आहे. भूजच्या भूकंपाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. किल्लारीचं संकट केवळ पवारांमुळंच निभावलं. आता ते आजारी आहेत. त्यामुळं घरात आहे. मात्र त्यांना घरात यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो,' अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला केली.

अजित पवार काय म्हणाले होते?

“अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत.'' अशा शब्दात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

 अजितदादा पुढे म्हणाले,'' भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती. टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करू नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करू नये.”

“दररोज सकाळी सात वाजल्यापासून मी सर्वांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेट घेतात. दिवसभर फोन करतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरू आहे. लोकांच्या सतत संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा हा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या भीषण संकटाशी लढत आहे. रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा, रेमेडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही माझी प्राथमिकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी, सहकारी मंत्र्यांशी, लोकप्रतिनिधींशी, विभागीय आयुक्तांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरू आहे. उद्योगक्षेत्राशी चर्चा केली जात आहे. त्यातून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे आणि रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करणे ही आजची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करून महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत. त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करून राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी हितावह ठरेल. कोरोनाविरुद्धची लढाई महाराष्ट्र जिंकणार आहे. अशातच महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करण्याचं पाप विरोधी पक्षांनी करू नये, असेही उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in