महेश लांडगेंच्या भोसरीकडेच राहणार पिंपरी पालिकेच्या आर्थिक चाव्या

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरीतीलच प्रबळ दावेदार असलेले भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी संधी न मिळाल्याने स्थायी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
महेश लांडगेंच्या भोसरीकडेच राहणार पिंपरी पालिकेच्या आर्थिक चाव्या
Nitin Landage to be elected unopposed as Pimpri Chinchwad Municipal Corporation Standing Committee Chairman

पिंपरी : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खजिन्याची चावी शेवटच्या वर्षी भोसरीकडेच कायम राहिली आहे. त्यातून शहराचे कारभारी आणि भोसरीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांचा वरचष्मा सिद्ध झाला आहे. भोसरी गावठाणातील ऍड नितीन लांडगे यांनी भाजपकडून स्थायी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आज (ता. 2 मार्च) दाखल केला. पालिकेतील भाजपचे स्पष्ट बहूमत पाहता येत्या शुक्रवारी (ता. 5 मार्च) होणाऱ्या या पदाच्या निवडणुकीची औपचारिकताच बाकी राहिली आहे. 

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरीतीलच प्रबळ दावेदार असलेले भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी संधी न मिळाल्याने स्थायी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. गेल्या 18 तारखेच्या सभेत त्यांची स्थायी समितीवर निवड झाली होती. ते बिनविरोध निवडून आलेले जुने एकनिष्ठ भाजपचे सदस्य आहेत. गेल्या चार वर्षांत त्यांना एकही पद मिळालेले नव्हते. त्यांच्याप्रमाणे शहराचे दुसरे कारभारी आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर पाठीराखे शत्रूघ्न काटे या ज्येष्ठ नगरसेवकांचीही निराशा झाली आहे. त्यांनाही गेल्या चार वर्षांत कुठल्याही पदावर संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे काटे व रवी लांडगे या दोघांचीच नावे स्थायीच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. 

भाऊ, दादा आणि जुने भाजपाई यांच्यातील सध्याचा पदाधिकारी वाटप फॉर्म्युला कायम राहिला. स्थायी समितीचे अध्यक्षपद हे भोसरीकडे राहण्याची शक्‍यता असल्याचे वृत्त सोमवारी "सरकारनामा'ने दिले होते. ते खरे ठरले. यामुळे भाऊ समर्थक महापौर माई ढोरे यांचे पद कायम राहणार आहे. तर, जुने भाजपाई नामदेव ढाके यांचे सभागृह नेतेपद कायम राहण्यावरही शिक्कामोर्तब झाले. एकूणच दादा, भाऊ आणि जुने एकनिष्ठ भाजपाई असा समतोल मुख्य तीन पदवाटपात कायम ठेवत निवडणुकीचे रणशिंगच भाजपने फुंकले आहे. 

स्थायीचे मावळते अध्यक्ष संतोष लोंढे हे महेश लांडगे यांचेच समर्थक आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे नवे होऊ घातलेले अध्यक्ष ऍड लांडगे हे व लोंढे हे भोसरीतील एकाच प्रभागातून (क्र.7) निवडून आले आहेत. तर, डावलले गेलेले रवी लांडगे हे जुन्या व नव्या स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागाच्या बाजूच्या प्रभागातील (क्र. 6) आहेत. ऍड. लांडगे हे शहराचे प्रथम महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पूत्र आहेत. त्यांची नगरसेवकपदाची ही दुसरी वेळ आहे. गतवेळी ते 2012 ला राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी महेश लांडगेंबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला व पुन्हा नगरसेवक झाले. 

राष्ट्रवादी निवडणूक लढवणार 

दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्यासाठी आपला उमेदवार उभा केला आहे. त्यांच्यावतीने प्रवीण भालेकर यांनी स्थायी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता येत्या शुक्रवारी त्यासाठी मतदान होणार आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in