गुंड सचिन शिंदेचे श्रद्धांजली फलक लावणाऱ्यांना पोलिसांचा दणकून प्रसाद...
Abhivan Deshmukh is active in breaking the cycle of bullying

गुंड सचिन शिंदेचे श्रद्धांजली फलक लावणाऱ्यांना पोलिसांचा दणकून प्रसाद...

कुख्यात गुंड सचिन शिंदेच्या हत्येनंतर श्रद्धांजलीचे फलक लावणाऱ्या युवकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.

शिक्रापूर (जि. पुणे) : कुख्यात गुंड सचिन शिंदेच्या हत्येनंतर श्रद्धांजलीचे फलक लावणाऱ्या युवकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांनी या युवकांना चोप देऊन त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले आहेत. शिक्रापूर, कोरेगाव, कोंढापूरी, वढू बुद्रूक, चौफुला, तळेगाव-ढमढेरे या गावांमध्ये मोठे फलक लावण्यात आले होते.

जिल्हा पोलिस अधिक्षक अभिवन देशमुख यांनी पुणे-नगर महामार्गावरील गावांमधील गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पोलिसांचे गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष आहे. संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.

खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे असे गुन्हे दाखल असलेल्या गुंड सचिन शिंदे याची पाच दिवसांपूर्वी लोणीकंद येथे हत्या करण्यात आली. शिक्रापूर व लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो एका हत्या प्रकरणातून काही महिन्यांपूर्वीच येरवडा कारागृहातून सुटला होता.

पुणे-नगर महामार्गावरील वाघोली, लोणीकंद, पेरणे, कोरेगाव-भिमा, तळेगाव-ढमढेरे, कोंढापूरी, रांजणगाव, कारेगाव, वढू, आपटी, वाजेवाडी, करंदी, पिंपळे-जगताप, चौफुला याभागात शिंदे याला माननारे अनेक युवक आहेत. शिंदेने स्थापन केलेल्या एका ग्रुपचे शेकडो युवक सदस्य आहेत. त्यामुळे त्याची हत्या झाल्यानंतर या गावांमध्ये शिंदेवर स्तुतीसुमने उधळणारे व त्याच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे अनेक फलक लावण्यात आले. 

आज सकाळी या सर्व फलकांची पोलिसांकडून माहिती घेण्यात आली. या फलकांवर नावे असलेल्या युवकांना शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेवून सर्वांना चोप देण्यात आला. या शिवाय या सर्वांवर सरकारी जागेचे विद्रुपीकरण तसेच याच अनुषंगाने काही गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अटकही करण्यास सुरूवात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली. सुरज तिखे (शिक्रापूर), शुभम मांजरे (चौफुला), मोन्या उर्फ शुभम भंडारे (वढू बुद्रूक) यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे तावसकर यांनी सांगितले.

स्वतंत्र पथक स्थापन...

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडांचे उद्दातीकरण किंवा त्यांच्या नावाचे फलक झळकविणाऱ्या युवकांवर यापुढे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले असून कारवाई सुरू केली आहे. पुढील काळात अशा युवकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा तावसकर यांनी दिला. 

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in