937 corona patients found in Pune on Thursday | Sarkarnama

पुण्यात अत्यवस्थ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 2 जुलै 2020

कोरोनाची लागण झालेल्या 937 रुग्णांची आज (ता. 2 जुलै) पुण्यात भर पडली. वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा पुण्यात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.

पुणे : कोरोनाची लागण झालेल्या 937 रुग्णांची आज (ता. 2 जुलै) पुण्यात भर पडली. वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा पुण्यात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.

आजपर्यंत 344 रुग्ण अत्यवस्थ आहेत. यात 56 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आज 14 जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 631 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

पुण्यात आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 19 हजार 42 इतकी झाली आहे. यातील 11 हजार 671 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 676 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे सहा हजार 695 ऍक्‍टीव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरात चार हजार 140 जणांची तपासणी करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसण्याचे प्रमुख कारण म्हणजे रोजच्या तपासणीची वाढविण्यात आलेली संख्या आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्य पथक पुण्यात आले होते. त्यांनी केलेल्या प्रमुख सूचनांपैकी प्रमुख सूचना रोजच्या तपासण्यांची संख्या वाढवावी, अशी होती. चाचण्या वाढविल्या तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते या भीतीतून बाहेर पडून तपासण्या वाढविण्याची सूचना या पथकाने केली होती. 

रुग्णांची संख्या वाढली तर फारसा फरक पडत नाही. मात्र, त्यातून जास्तीत जास्त रुग्ण सापडल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने मृत्यूचे प्रमाण रोखण्यास मदत होते. रुग्णांची संख्या वाढण्याला घाबरण्यापेक्षा मृत्यूदर कमी केला पाहिजे, हे प्रमुख सूत्र यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुणे महापालिकेने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रानुसार शहरात सर्वच भागांत रुग्ण सापडत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रे वाढली, रूग्ण वाढले. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा भर असल्याचे सांगण्यात आले आहे. 

कोरोना रुग्णांच्या उच्चांकी संख्येने ठाणे जिल्हा हादरला 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात गुरुवारी (ता. 2 जुलै) जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. 

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात बाधित रुग्ण एक हजार 921 आढळले आहेत. दिवसभरात 31 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 36 हजार 567 तर, मृतांची संख्या 1 हजार 130 वर जाऊन पोचली आहे. या वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येसह, वाढत्या मृत्यूमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख