राजकीय दबावातून 54 जणांची नावे वगळली : खेड शिवसेनेचा रोख कोणाकडे?  - 54 names removed from voter list due to political pressure: Khed Shiv Sena alleges | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

राजकीय दबावातून 54 जणांची नावे वगळली : खेड शिवसेनेचा रोख कोणाकडे? 

महेंद्र शिंदे 
रविवार, 3 जानेवारी 2021

एका गटाने हरकत घेतल्यानंतर प्रशासनाने प्रारूप यादीत असलेली ही 54 नावे अंतिम मतदार यादीतून वगळली आहेत.

कडूस (जि. पुणे) : ऐन ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रशासनाने येणवे बुद्रूक (ता. खेड) येथील 54 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा प्रकार घडला आहे. या मतदारांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा घाट प्रशासनाने राजकीय दबावापोटी घातला असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या मतदारांना संविधानिक हक्क द्यावा, अशी मागणी शिवसेनेने प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. 

येणवे बुद्रुक आणि येणवे खुर्द या दोन्ही गावांच्या सीमेवरील 54 मतदारांची नावे प्रशासनाने अचानक वगळल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने प्रशासनाचा निषेध केला आहे. याबाबत शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, विजया शिंदे, उर्मिला सांडभोर, अर्चना सांडभोर यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे. 

सध्या येणवे बुद्रूकची ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. येणवे खुर्दच्या निवडणुकीला अवकाश आहे. यादीतून वगळलेल्या मतदारांची नावे येणवे बुद्रुकच्या मतदार यादीत होती. हे मतदार येणवे बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे येणवे बुद्रूक गावचे आधारकार्ड, मतदारकार्ड, रेशनिंग कार्ड आहे. या अगोदर त्यांनी मतदानसुद्धा केले आहे.

एका गटाने हरकत घेतल्यानंतर प्रशासनाने प्रारूप यादीत असलेली ही 54 नावे अंतिम मतदार यादीतून वगळली आहेत. त्यानंतर या मतदारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. हे नागरिक येणवे बुद्रूकचे असल्याचे नमूद करून रहिवासी पुरावे तपासून नावे पुन्हा पुरवणी यादीत समाविष्ट करण्याची सूचना निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी खेडच्या तहसील कार्यालयाला केली. त्यानंतर ही नावे यादीत समाविष्ट करण्यात आली, परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसात प्रशासनाने पुन्हा ही नावे अचानक वगळल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. 

"हे नागरिक येणवे बुद्रुकचेच असल्याचे पुरावे आहेत. त्यांनी या अगोदर मतदान केले आहे. या वस्तीवर राहणाऱ्या अन्य नागरिकांची नावे मात्र येणवे बुद्रुकच्याच यादीत आहेत, परंतु हीच नावे का वगळली? ' असा प्रश्न तालुकाप्रमुख धनवटे यांनी करीत प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला आहे. हे नागरिक निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा घाट प्रशासनाने घातला असून या मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून त्यांना मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी केली आहे. 

स्थळपाहणी अहवालानुसार नावे वगळली  : तहसीलदार 

याबाबत तहसीलदार वैशाली वाघमारे म्हणाल्या, "निवडणूक आयोगाने रहिवासी पुरावे तपासून मतदारांची नावे समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ग्रामसेवक, तलाठी व मंडलाधिकारी यांच्या पथकाने जागेवर जाऊन पाहणी केली. त्यात या नागरिकांच्या वास्तव्याचे ठिकाण येणवे बुद्रूक ग्रामपंचायतीच्या प्रभागात येत नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे या मतदारांची नावे वगळली आहेत.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख